लोकमत न्यूज नेटवर्कवडोदबाजार : थर्टीफर्स्टला तळीरामांकडून होणारा उपद्रव पाहता वडोदबाजार पोलिसांनी गस्त वाढवली असून विशेषत: तळीरामांवर लक्ष केंद्रीत केले आहेत. नशेत वाहन चालविणाºयांची तपासणी करून नशेत आढळून आल्यास पोलीस कारवाईचा बडगा उगारत आहेत. सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत करण्याची तरुणाईमध्ये मोठी ‘क्रेझ’ निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य महामार्गावरील हॉटेल हाऊसफुल्ल दिसून येत आहेत. या हुल्लडबाजीत नशेत वाहन चालवताना अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागल्याचे अलीकडेच झालेल्या अपघातातून दिसून येते.सहायक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांनी ठाण्याची सूत्रे हाती घेतल्यापासून तळीरामांना चांगलाच धडा शिकवत आहे.वडोदबाजार गाव व परिसरात हॉटेल, ठेल्यावरील तळीरामांचा सायंकाळी शेतातून घरी परतणाºया महिलांना मोठा त्रास व्हायचा. अर्चना पाटील यांनी तळीरामांना फटकारल्याने त्यांचा वावर कमी झाला आहे. त्यामुळे रस्त्याने पायी चालणारे तळीराम पाटील यांना पाहताच आपला रस्ता बदलत आहेत. मागील काही दिवसांत पोलीस ठाण्याचे गावातून स्थलांतर झाल्यापासून तळीरामांचा झिंगाट वाढला होता.परंतु आता नव्यानेच पोलिस ठाण्याची सूत्रे पाटील यांनी घेतल्याने त्यांचा चांगलाच वचक निर्माण झाला असून महिला वर्गातून त्यांचे स्वागत केले जात आहे.शुक्रवारी रात्री तीन जणांवर पोलिसांनी कारवाई केली. दरम्यान, दारूच्या नशेत तर्रर्र होऊन नातेवाईकास भेटायला जाणे एका तरुणास चांगलेच महागात पडले. नातेवाईकाची भेट होण्याऐवजी पोलिसांनी त्याची थेट ठाण्यात रवानगी केली. त्यामुळे भेटण्याची वाट पाहत थांबलेल्या नातेवाईकाची चांगलीच पंचाईत झाली. शेवटी त्या तरुणास समज देऊन सोडून देण्यात आले.
वडोदबाजार पोलिसांकडून तळीरामांची तपासणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 12:31 AM