विद्युत खांबांवरील केबलचे जाळे हटविण्यासाठी याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 05:36 PM2019-01-15T17:36:29+5:302019-01-15T17:36:40+5:30
शहरातील विद्युत खांबांवरून टाकलेले वायर व केबल हटविण्यासंदर्भात दाखल याचिकेत महावितरण कंपनीला प्रतिवादी करण्यात आले आहे.
औरंगाबाद : शहरातील विद्युत खांबांवरून टाकलेले वायर व केबल हटविण्यासंदर्भात दाखल याचिकेत महावितरण कंपनीला प्रतिवादी करण्यात आले आहे. औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. आर. जी. अवचट यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे.
शहरातील विद्युत खांबांभोवती अनेक प्रकारच्या बेकायदेशीर वायरचे जाळे पसरलेले असून, त्यामुळे अपघात आणि जीविताला धोका पोहोचत असल्याने त्याविरुद्ध योग्य त्या कारवाईचे आदेश द्यावेत, अशी विनंती करणारी याचिका मुकेश राजेश भट यांनी अॅड. संदेश व्ही. हांगे यांच्यामार्फत खंडपीठात दाखल केली आहे. याचिकेत म्हटल्यानुसार शहरात ४० ते ५० हजार पथदिवे आहेत. सर्व पथदिवे मनपाची मालमत्ता आहे.
त्याच्या देखभालीची जबाबदारीही महापालिकेची आहे. या पथदिव्यांभोवती खाजगी केबल चालक आणि इंटरनेट चालकांनी वायरचे जाळे पसरवले आहे. जालना रोड, जळगाव रोड आणि रेल्वेस्टेशन रोडवर अनेक ठिकाणी पथदिव्यांभोवती खाजगी वायरचे जाळे लटकलेले दिसते. याविषयीची अनेक छायाचित्रेही न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहेत. विद्युत कंपनीच्या खांबांचा वायर, केबल टाकण्यासाठी वापर होत असल्याने त्यांना प्रतिवादी करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यावरून खंडपीठाने महावितरणला प्रतिवादी करीत, नोटीस बजावण्याचा आदेश दिला.