वैजापुर (औरंगाबाद ) : येथील बाजारसमितीमध्ये कांद्याला ५२ रुपये क्विंटलचा भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरभर कांदा मुख्य रस्त्यात ताकेल्याची घटना आज दुपारी घडली. यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता. पोलिसांनी नगरपालिकेच्या जेसीबीची मदतीने रस्ता वाहतुकीस मोकळा केला.
तालुक्यातील चांडगाव येथील शेतकरी प्रमोद गायकवाड यांनी आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये कांदा विक्रीसाठी घेऊन गेले होते. लिलावात कांद्याची ५२ रुपये प्रतिक्विंटल बोली लावली गेली. त्यामुळे संतापलेल्या गायकवाड यांनी कांद्याचा ट्रॅक्टर मार्केटमधून काढून सरळ शहरात आणला मुख्य रस्त्यात रिकामा केला. वाहतूक खर्च २ हजार रुपये लागला अन् त्यात कांद्याला ५२ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. त्यामुळे सरकारचा निषेध करून कांदा रस्त्यावर टाकल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
दरम्यान, कांदा रस्त्यात टाकल्यानंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, पोलिस नाईक संजय घुगे, मनोज कुलकर्णी व इतर पोलिस कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले होते. यानंतर पोलिसांनी नगरपालिकेच्या जेसीबी मशिनच्या सहाय्याने रस्ता मोकळा करून वाहतूक सुरळीत केली.