वैजापूर : बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील जवळपास ७६ हजार हेक्टर क्षेत्रावरील कपाशीचे जीपीएसद्वारे पंचनामे करुन हा अहवाल दहा दिवसात सादर करण्याचे आदेश कृषि विभागाला देण्यात आले आहेत. पण हे काम संपवण्यासाठी कृषि विभाग काही पंचनामे शेताच्या बांधावर व काही पंचनामे कार्यालयात बसून पूर्ण करत असल्याचा आरोप शेतकर्यांनी केला आहे. हे पंचनामे करण्यासाठी शेतकर्यांनाच फोटो आणायला सांगितले जात आहे, हे विशेष.
बोंडअळीसंदर्भात तहसीलदार सुमन मोरे यांनी बैठक घेऊन ग्रामसेवक, तलाठी, कृषि सहायक, सरपंच, पोलीस पाटील यांना नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथके संपूर्ण तालुक्यात तैनात करण्यात आली आहेत. पण केवळ दहा दिवसात हे आव्हान पूर्ण करणे अशक्य वाटत असल्याने कृषि विभागाकडून काही पंचनामे शेताच्या बांधावर तर काही पंचनाम कार्यालयात बसून पूर्ण करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे कितपत खरे होतील, याबाबत साशंकता आहे.
तालुक्यातील वैजापूर, खंडाळा, शिऊर, गारज, लासूरगाव, महालगाव, लोणी खुर्द, नागमठाण, बोरसर आणि लाडगाव या दहा महसूल मंडळातील ५९ तलाठी सज्जेअंतर्गत असलेल्या १६४ महसूली गावात पंचनामे करायचे आहेत. विशेष म्हणजे हे सर्व पंचनामे शेतकर्यांच्या बांधावर जावून नुकसानग्रस्त शेतीचे जीपीस यंत्रणेद्वारे फोटो मोबाईल अॅपच्या सहाय्याने काढण्यात यावेत, जेणेकरून नुकसानीच्या दाव्याची पडताळणी करता येईल. पण संबंधित कर्मचारी बांधावर न जाता शेतकर्यांनाच कार्यालयात बोलावून सरासरी ५० ते ६० टक्के क्षेत्रावर नुकसान झाल्याचे दाखवून पंचनामे पूर्ण करत असल्याचा आरोप आहे.
मात्र, नुकसानीचे क्षेत्र जास्त असल्याने या कर्मचार्यांना एका दिवसात केवळ ३० ते ४० शेतकर्यांच्या बांधापर्यंतच पोहचणे शक्य होत आहे. आतापर्यंत १६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाल्याचा दावा तालुका कृषि अधिकारी विष्णू मोरे यांनी केला आहे. तालुक्यात एकूणच संपूर्ण कपाशीचे पीक बोंडअळी व किडीने पोखरले असून पंचनामे करणारी यंत्रणासुद्धा ही वस्तूस्थिती पाहून हादरली आहे.
कृषी सहायकाकडे पाच ते सहा गावांचा कारभारसंयुक्त पंचनामा करताना कृषी विभागाचा फिल्डवरील कर्मचारी असलेला कृषी सहायक महत्त्वाचा घटक आहे. परंतु तालुक्यात कृषी सहायकाकडे किमान पाच ते सहा गावांचा कारभार असून हजारो हेक्टर क्षेत्र आहे. तर एवढ्याच गावात तीन ते चार तलाठी व तेवढेच ग्रामसेवक आहेत. अशावेळी एकट्या कृषी सहायकाची सर्व ठिकाणी हजेरी लागणे अशक्य आहे. शिवाय काही ठिकाणी कृषी सहायकालाच पथकप्रमुख बनविण्यात आलेले आहे. येत्या दहा दिवसात हे पंचनामे पूर्ण करायचे असल्याने ग्रामीण भागात कर्मचार्यांकडून आता नवनवीन युक्त्या समोर येऊ लागल्या आहेत. पंचनामे करताना हलगर्जीपणा करणार्या कर्मचार्यांची गय केली जाणार नसल्याचे तहसीलदार सुमन मोरे यांनी सांगितले.