लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : लाकडाची बेकायदा वाहतूक करणारी गाडी सोडण्यासाठी ३२ हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी वैजापूर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज बबनराव कापुरे (४७) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तालुक्यातील दहेगाव शिवारात एका हॉटेलवर छापा टाकून अटक केली. ही कारवाई शनिवारी सायंकाळी करण्यात आली.या घटनेतील तक्रारदार हा नगरसोल येथील रहिवासी असून, तो लाकूड वाहतुकीचा कंत्राटदार आहे. वन विभागाने त्यांच्या एका वाहनावर कारवाई करीत हेवाहन जप्त केले होते. हे वाहन सोडण्यासाठी वनक्षेत्रपाल मनोज कापुरे याने ३२ हजार रुपयांची लाच मागितली, तसेच इतर दोन वाहनांसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये मासिक हप्ता देण्याची मागणी केली; मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने औरंगाबाद येथील लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला. त्यांनी माईक देऊन तक्रारदारास मागणीची रेकॉर्डिंग करण्यास सांगितले. त्यानुसार कापुरे याने पैशाची मागणी केली असता ते रेकॉर्ड लाचलुचपत विभागाकडे सादर करण्यात आले. दरम्यान, आधी दहा हजार रुपये कापुरे यास देण्यात आले होते; मात्र कापुरे याने लाचेची मागणी केल्याची खात्री झाल्यापासून लाचलुचपत विभागाचे पथक त्याच्या मागावर होते. अखेर लाचलुचपत विभागाचे पो.नि. पाटील यांच्या पथकाने कापुरे याला दहेगाव येथे पेट्रोल पंपाशेजारी एका हॉटेलवर सापळा रचून अटक केली.
वैजापूरचा वनपरिक्षेत्र अधिकारी ३२ हजारांची लाच घेताना जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 12:20 AM