औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावाच्या तब्बल ११ महिन्यांनंतर १४ फेब्रुवारीपासून जनशताब्दी एक्स्प्रेस धावणार आहे. विशेष म्हणजे, ही रेल्वे दादरऐवजी आता पूर्वीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत (सीएसएमटी)धावणार आहे. त्यामुळे दक्षिण मध्य रेल्वेकडून मुंबईला ये-जा करणाऱ्या प्रवाशांना एकप्रकारे ‘व्हॅलेंटाईन गिफ्ट’च देण्यात आले आहे.
जनशताब्दी एक्स्प्रेस १४ फेब्रुवारीपासून जालना येथून सकाळी ८.३० वाजता सुटेल. ही रेल्वे सकाळी ९.१५ वाजता औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर दाखल होईल आणि ९.२० वाजता रवाना होईल. तर सीएसएमटी येथे दुपारी ४.२० वाजता पोहोचेल. तर सीएसएमटी - जालना जनशताब्दी एक्स्प्रेस ही सीएसएमटी येथून दुपारी १२.१० वाजता सुटेल. ही रेल्वे औरंगाबाद येथे सायंकाळी ६.२५ वाजता येईल आणि ६.३० वाजता जालन्यासाठी रवाना होईल. जालना येथे रात्री ७.४५ वाजता ही रेल्वे पोहोचेल.
कोरोना प्रादुर्भावाने गतवर्षी मार्चपासून ही रेल्वे बंद होती. मुंबईला ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी ही रेल्वे पुन्हा सुरू करण्याची मागणी केली जात होती. अखेर ही रेल्वे पुन्हा एकदा धावणार आहे. जनशताब्दी एक्स्प्रेस औरंगाबादकरांसाठी महत्त्वाची रेल्वे आहे. ही रेल्वे सुरुवातीला मुंबईपर्यंत धावत होती. परंतु, पुढे ही गाडी दादरपर्यंतच सोडण्यात आली. २०१५ मध्ये ही रेल्वे जालन्यापर्यंत वाढविण्यात आली. दादरवरून ये-जा करताना अनेक अडचणी येत असल्याने ही रेल्वे पुन्हा सीएसएमटीपर्यंत नेण्याची मागणी होत होती. अखेर ही मागणी आता पूर्णत्वास गेली आहे.
नव्या वेळापत्रकाने एका दिवसात ये-जा अशक्यजनशताब्दी एक्स्प्रेस आता नव्या वेळापत्राप्रमाणे धावणार आहे. ही रेल्वे पूर्वी औरंगाबादहून सकाळी ६ वाजता रवाना होऊन दुपारी १२ वाजेपर्यंत दादर येथे पोहोचत असे. काही तासांत काम आटोपून जनशताब्दी एक्स्प्रेसनेच औरंगाबादला परतता येत असे. परंतु नव्या वेळापत्रकात ही रेल्वे मुंबईला पोहोचण्यापूर्वीच तेथून दुसरी रेल्वे सुटणार आहे. त्यामुळे प्रवाशांना एका दिवसात मुंबईला ये-जा करता येणार नाही.