औरंगाबाद : मी शासकीय सेवेत असल्यामुळे बदल्या नेहमीच्या ठरलेल्या. तसेच प्रशासकीय दौऱ्यामुळे कायम व्यस्त वेळापत्रक असायचे. यातून वेळ काढत माझी पत्नी कंचन चव्हाण यांनी महिलांना सक्षम करण्यासाठी स्वत: ब्युटी थेरपी, स्पाचे शिक्षण घेत अत्याधुनिक स्पाच्या शाखा सुरू केल्या. कुटुंबात उद्योगी आणि शैक्षणिक, शेतीप्रिय वातावरण असल्यामुळे आमच्यासाठी प्रत्येक दिवस व्हॅलेंटाइन डे असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.
शासकीय सेवेत आल्यानंतर औरंगाबादमधील एका स्नेह्यांच्या मध्यस्थीने बीड जिल्ह्यातील आष्टी-पाटोदा येथून थेट मध्य प्रदेशमधील (ता. शहापूर, जि. बुऱ्हाणपूर) धामणगाव येथील शेतकरी कुटुंबातील कंचन यांच्याशी १ जानेवारी १९९२ रोजी माझा विवाह झाला. कंचन या हिंदी माध्यमातून एम. कॉम झालेल्या आहेत. मोठी कन्या पायल हिने इटलीतून उच्च शिक्षण घेतले, तर लहान मुलगी डॉ. मानसी ही मेडिसीनमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे.
कुटुंबांकडे लक्ष देत शाळांना स्नेहसंमेलनासाठी लागणारे गणवेश पुरविणारी संस्था सुरू करणे, गार्डनिंग टेरेसचा नवीन प्रयोग, ही कामे कंचन यांनी केली. त्या प्रयोगाला मुंबई महापालिकेने सलग तीन वर्षे पारितोषिक दिले. या धावपळीत स्वित्झर्लंडच्या संस्थेचा सिडीस्को क्रॅशकोर्स कंचन यांनी पूर्ण केला. त्या स्वत: उत्कृष्ट ड्रायव्हर आहेत. सध्या पॉलिहाऊस आणि शेतीतील नवीन प्रयोगांवर कंचन काम करीत आहेत. शासनाच्या कौशल्य विकास व प्रशिक्षण विभागात त्या समन्वयक आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.