औरंगाबाद : गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड ठरणाऱ्या घाटी रुग्णालयातील खाटांची संख्या १,२६० आहे. यात काही खाटांना जोडूनच स्टँड आहे, तर स्वतंत्र सलाईन स्टँडची संख्या ८३२ आहे. त्यामुळे सलाईन लावण्यासाठी स्टँड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविण्याची वेळ येत आहे. घाटीत शस्त्रक्रियेनंतर वॉर्डात आणलेल्या रुग्णाची सलाईनची बाटली लावण्यासाठी स्टँड नसल्याने एका बालिकेला ती बाटली हातात धरण्याची वेळ आल्याच्या प्रकाराने एकच खळबळ उडाली.
घाटी रुग्णालयात १,२६० खाटा आहेत. प्रत्यक्षात १,४०० ते १,५०० रुग्णांवर घाटीत उपचार होतात. खाटांअभावी अनेकांना जमिनीवर उपचार घ्यावे लागतात. खाटा आणि रुग्णसंख्येचा विचार करता सलाईन स्टँड अपुरे पडतात; परंतु प्रत्येक रुग्णाला सलाईन लावावे लागत नाही. व्हायरल झालेल्या फोटो प्रकरणात बालिकेने अवघ्या काही मिनिटांसाठी बाटली हातात धरल्याचा दावा घाटी प्रशासनाकडून होत आहे.
रुग्णांचा वाढता भार आणि अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे घाटी प्रशासनाला रुग्णसेवा देताना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ही वेळ पुन्हा अन्य कोणावर येऊच नये, यासाठी प्रयत्न करण्याची खरी गरज असल्याच्या प्रतिक्रिया रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांमधून व्यक्त होत आहे.