औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील विभागीय रक्तपेढीत रक्त व रक्तघटकांचा अद्यापही तुटवडा आहे. काही गटांचे रक्तच उपलब्ध नसल्याने रक्तासाठी भटकंती करण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाईकांवर येत आहे. त्यामुळे रक्तदानासाठी दात्यांनी पुढे येण्याची गरज आहे.
घाटीतील वॉर्ड क्रमांक २८ मध्ये प्रसूतीसाठी एक महिला दाखल झालेली आहे. या महिलेचे हिमोग्लोबीन कमी असल्याने प्रसूतीदरम्यान रक्त लागण्याची शक्यता गृहीत धरून रक्ताचे नियोजन करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यासाठी ‘ए’ पॉझिटिव्ह रक्त हवे आहे; परंतु रक्तपेढीत या गटाचे रक्तच उपलब्ध नाही. त्यामुळे नातेवाईकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
याविषयी प्रसूतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा म्हणाले, प्रसूती होण्यास अद्याप अवधी आहे. प्रसूतीदरम्यान रक्त लागले तर ते उपलब्ध राहील, यासाठी नियोजन करण्यास सांगण्यात आले आहे. ही घाटीतील एका रुग्णाची स्थिती आहे. याप्रमाणे रक्ताच्या तुटवड्याने गेल्या काही दिवसांपासून अनेकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. एका व्यक्तीस रक्ताची आवश्यकता भासल्यावर थेट समाजमाध्यमांतून आवाहन केले जात आहे. त्यातून अनेक जण मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. तरीही उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे रक्तदानात घट झाल्याने रक्त आणि रक्तघटकांचा पुरवठा करण्यासाठी रक्तपेढीला मोठी कसरत करावी लागत आहे. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी नागरिक, रक्तदान शिबीर संयोजकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.