लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यासह लगतच्या भागासाठी जीवनवाहिनी ठरलेल्या घाटी रुग्णालयात सध्या अनेक औषधींचा ठणठणाट असल्याचे समजते. जवळपास ५० औषधी पुरवठादारांचे ९.२४ कोटी रुपये थकले आहेत. परिणामी, अनेकांनी औषधांचा पुरवठा ठप्प झाल्याने औषधांचा हा तुटवडा आहे. त्याचा फटका दररोज हजारो गोरगरीब रुग्णांना बसत आहे.मराठवाडा, खान्देश, उत्तर महाराष्ट्र आणि अन्य भागातून दररोज हजारो गोरगरीब रुग्ण उपचारासाठी घाटी रुग्णालयात येतात. या ठिकाणी वैद्यकीय उपचारांसह विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करून घेणाºयांची संख्या मोठी आहे. बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) दररोजच्या रुग्णांची सरासरी संख्या तीन हजारांच्या आसपास असते, तर आंतररुग्ण विभागात (आयपीडी) नेहमीच दीड हजारांवर रुग्ण दाखल असतात. घाटीला औषधी व साहित्याचा पुरवठा करणाºया विविध कंपन्यांचे पैसे थकल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून औषधी पुरवठा विस्कळीत झाला आहे. नाइलाजाने रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड सहन करून खाजगी मेडिकलमधून औषधी खरेदी करण्याची वेळ येत आहे. ५० पुरवठादारांची तब्बल ९.२४ कोटींची थकबाकी आहे. ‘पीएलए’मधून त्यांची १.५० कोटीची थकबाकी दिली जाणार आहे; परंतु १.५० कोटीतून कोणाकोणाची अन् किती थकबाकी देणार, असा प्रश्न आहे. इतक्या रकमेतून औषधीपुरवठा सुरळीत होणे अशक्य आहे.
घाटीत औषधींचा ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:52 AM