औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील परिचारिकांनी गुरुवारी सकाळपासून शासकीय निवासस्थान मिळण्याच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन पुकारले. त्यामुळे बाह्यरुग्ण विभागासह विविध विभागांमधील रुग्णसेवा विस्कळीत झाली. आंदोलन पुकारल्यावर खडबडून जागे झालेल्या घाटी प्रशासनाने लवकरात लवकर निवासस्थान देण्यात येईल, असे आश्वासन दिल्यामुळे चार तासांनंतर परिचारिकांनी बंद मागे घेतला. घाटी रुग्णातील परिचारिकांना निवासस्थान मिळत नसल्याने गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. शासकीय निवासस्थानात अनेक जण नियमबाह्यपणे राहत आहेत. अनेकांनी तर पोटभाडेकरू ठेवले आहेत. अनेक निवासस्थानांची पार दुरवस्था झालेली आहे. याकडे घाटी प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. वारंवार मागणी करूनही परिचारिकांना निवासस्थान मिळत नसल्याने परिचारिका संघटनेने गुरुवारी काम बंद आंदोलन पुकारले. सकाळी ७.३० वाजेपासून या आंदोलनास सुरुवात झाली. प्रशासनाने तातडीची बैठक बोलावली. यावेळी अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुहास जेवळीकर, संघटनेच्या सरचिटणीस इंदूमती थोरात यांची उपस्थिती होती. यावेळी लवकरात लवकर निवासस्थान देण्याचे प्रशासनाने आश्वासन दिले.
घाटीतील रुग्णसेवा चार तास विस्कळीत
By admin | Published: February 18, 2016 11:51 PM