औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) नवजात शिशुचिकित्साशास्त्र विभागात आगामी दोन महिन्यांत मानवी दूध बँक म्हणजे मातृदुग्ध पेढी (ह्यूमन मिल्क बँक) उभी राहणार आहे. यासाठी रोटरी क्लब आॅफ औरंगाबाद वेस्ट आणि घाटी रुग्णालय प्रशासनात गुरुवारी (दि.३) सामंजस्य करार झाला. या बँकेमुळे अनेक कारणांनी नवजात शिशुंची आईच्या दुधासाठी होणारी परवड थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवजात शिशुचिकित्साशास्त्र विभागप्रमुख डॉ. एल. एस. देशमुख यांच्या संकल्पनेतून मातृदुग्ध पेढी सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. यासाठी शासन दरबारी व रोटरी क्लब आॅफ औरंगाबाद वेस्टशी चर्चा झाली. अखेर जवळपास ४० लाखांच्या निधीतून उभारण्यात येणारी ही बँक लवकरच पूर्णत्वास जाणार आहे. करारप्रसंगी रोटरी क्लबतर्फे जिल्हा गव्हर्नर सुहास वैद्य, अध्यक्षा मंजूषा लांडगे, सचिव रुपाली अष्टपुत्रे, प्रकल्प प्रमुख हेमंत लांडगे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा, डॉ ज्योती इरावणे, नवजात शिशुचिकित्साशास्त्र विभागाचे डॉ. अमोल जोशी, डॉ अुतल लोंढे आदी उपस्थित होते. आशिया खंडातील पहिली मानवी दुधाची बँक ही १९९४ मध्ये सायन हॉस्पिटल येथे स्थापन झाली. घाटीतील ही बँक मराठवाड्यातील पहिली अशा प्रकारची बँक ठरणार आहे.काय आहे ही बँक?मातेचे दूध बाळाकरिता सर्वोत्तम आहार आहे. परंतु काही कारणांनी कमी वजन, कमी दिवसाचे अत्यवस्थ नवजात शिशू अथवा काही वेळेस मातादेखील अत्यवस्थ असतात. अशा वेळी बाळासाठी आईच्या दुधाची कमतरता भासते. तेव्हा या बँकेतील दूध शिशूला देता येते. मानवी दुधाच्या बँकेसाठीचे दाते हे या रुग्णालयातील किंवा रुग्णालयाबाहेरील माता असू शकतात. दूध हाताने किंवा ब्रेस्ट पंपाच्या साह्याने जमविले जाते. दुग्धदान करणाऱ्या आईला एचआयव्ही, कावीळ बी, सी, नसल्याची खातरजमा केली जाते. त्यानंतर दुधाचे पाश्चरायझेशन केले जाते. त्यानंतर हे दूध साठवून ठेवले जाते. जशी गरज पडेल तसे हे दूध गरजू नवजात शिशूंना दिले जाते.
घाटीत दोन महिन्यांत ‘मानवी दुधाची बँक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 6:29 AM