औरंगाबाद: प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई न करण्यासाठी त्यांच्याकडून दहा लाखाची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडलेले जल आणि भूमी व्यवस्थान संस्थेचे(वाल्मी) महासंचालक हरिभाऊ गोसावी आणि सहसंचालक राजेंद्र क्षीरसागर यांचे पुण्यातील उच्चभ्रू वसाहतीत कोट्यवधी रुपये किंमतीचे बंगले आणि बँकामध्ये लॉकर असल्याचे समोर आले. त्यांच्या बंगल्याची झडती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून घेतली जाणार आहे.
याविषयी अधिक माहिती देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक वर्षाराणी पाटील म्हणाल्या की, वाल्मीचे महासंचालक आणि जलसंधारण आयुक्तालयाचे आयुक्त असे दोन पदे गोसावी सांभाळत होते. तर क्षीरसागर हे अधीक्षक अभियंता दर्जाचे अधिकारी असून ते सहसंचालकपदी कार्यरत आहेत. तक्रारदार हे त्यांच्या अधिपत्याखालील एका संस्थेत प्राध्यापक आहे. काही दिवसापूर्वी आरोपींनी त्यांना बोलावून घेत तुमची नियुक्ती चुकीच्या पद्धतीने झाली असून तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करावी लागेल. तुम्हाला निलंबित करण्यात येणार आहे. निलंबनाची कारवाई न करण्यासाठी आणि कागदपत्रांची पडताळणीची प्रक्रिया थांबविण्यासाठी आरोपींनी दहा लाखाची लाच मागितली. शुक्रवारी (दि,२९)वाल्मीतील कार्यालयात गोसावी यांनी क्षीरसागर यांच्यामार्फत लाचेच रक्कम तक्रारदाराकडून घेताना पोलिसांनी सापळा रचून रंगेहात पकडले.
पुण्यात कोट्यावधींची संपत्ती या कारवाईनंतर पोलिसांनी आरोपींच्या येथील शासकीय निवासस्थानाची झडती घेतली. या घरझडतीत फारसे काही पोलिसांच्या हाती लागले नाही. गोसावी यांचे पुण्यातील शिवाजीनगर येथे तर क्षीरसागर यांचा सिंहगड सिटीमध्ये अलिशान बंगला असल्याचे चौकशीत समोर आले. या बंगल्यांची किंमत कोट्यवधी रुपये आहे. शिवाय उभयतांची पुणे येथील बँकामध्ये लॉकर आहे. या लॉकरची तपासणी केली जाणार आहे.या लॉकरमध्ये काय मिळते, शिवाय त्यांच्या बँक खात्यात किती रक्कम शिल्लक आहे. त्यांच्या खात्यातून किती रक्कमेचे व्यवहार झाले, याबाबतची पडताळणी केली जाणार आहे.