नांदेड : आगामी पावसाळ््यात १ जुलै रोजी एकाच दिवशी सात लाख ९१ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन आहे. त्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी दिले. जिल्हास्तरीय लोकशाही दिनानंतर झालेल्या बचतभवन येथील समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यापुढे लोकशाही दिनासाठी उपस्थित न राहणाऱ्या विभाग प्रमुखांना कारणे दाखवा नोटिस बजावण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी काकाणी यांनी दिले. जिल्हाधिकारी काकाणी म्हणाले, शासनाचे विविध विभाग व जनतेच्या सहकार्याने जिल्ह्यात १ जुलै ते ७ जुलै २०१६ या कालावधीत वनमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे. एकाच दिवशी ७ लाख ९१ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक विभागाला दिलेल्या लागवडीच्या उद्दिष्टाची पूर्वतयारी वेळीत करावी. विविध संस्था, संघटना आणि कार्यकत्यांचा सक्रीय सहभाग घेणे आवश्यक असल्याचे सूचित केले. तसेच लोकशाही दिनात आलेल्या काही अर्जावर सूचना देवूनही कार्यवाही करण्यास दिरंगाई केल्याचे निदर्शनास आल्यास त्यावरही कारवाई प्रस्तावित केली जावी, असेही ते म्हणाले. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, निवासी जिल्हाधिकारी जयराज कारभारी, अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यु. ए. कोमवाड, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक गणेश पाटील, कृषी अधीक्षक डॉ. टी. एस. मोटे, जिल्हा निबंधक विनायक कहाळेकर, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक यु. बी. वाघमारे, अधीक्षक भूमिअभीलेख वसंत निकम, विभागीय नियंत्रक बाळासाहेब घुले आदींची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)
जिल्ह्यात वनमहोत्सव सप्ताह
By admin | Published: May 03, 2016 1:00 AM