औरंगाबाद : ३१ आॅगस्ट ही डेडलाईन संपली आहे. त्यामुळे आता काँग्रेसशी बोलणी होणार नाही. वंचित बहुजन आघाडीची जवळपास ५० उमेदवारांची पहिली यादी ५ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येईल, असे आज येथे वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश देखरेख समितीचे अध्यक्ष अर्जुन सलगर यांनी जाहीर केले.
वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा, शहर व तालुका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतील सूचना ऐकून घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. समितीचे सदस्य दीपक मोरे व अतुल बहुले यांनी बैठकीस मार्गदर्शन केले. पहिल्या यादीत ओबीसींमधील सूक्ष्म जातीच्या उमेदवारांचा समावेश राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
फरकच समजत नाहीबैठकीत डॉ. संदीप घुगरे यांनी भारिप- बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडी यातला फरकच समजत नसल्याची तक्रार केली. हे स्पष्ट झाले पाहिजे. अन्यथा ओबीसी दूर जाऊ शकतात, असा इशारा दिला. मात्र यावर देखरेख समितीने खुलासा केला नाही. वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आहे. त्यात भारिप- बहुजन महासंघ लवकरच विलीन होईल, असे ते म्हणाले. वंचितचा विरोधी पक्षनेता होईल, असं मुख्यमंत्री सांगताहेत पण आता वंचित बहुजन आघाडीचे अॅड. बाळासाहेब आंबेडकर हे मुख्यमंत्री होतील, हे लक्षात ठेवा, असे अॅड. सुभाष माने यांनी जाहीर केले.
ओबीसींचे आरक्षण हटविण्याचा डाव.... संघप्रमुख मोहन भागवत यांनी आरक्षणाची समीक्षा करा म्हणताच महाराष्ट्रात ओबीसींचे राजकीय आरक्षण कमी केल्याचा जीआर काढणं हा योगायोग नाही. याबद्दल जनजागृती करणं हेही आमच्या समितीचं काम असल्याचं सलगर यांनी सांगितले. रवी तायडे यांनी सूत्रसंचालन केले. महेश निनाळे, बाबासाहेब पवार, उद्धव बनसोडे, श्रीरंग ससाणे, जया गजभिये, रेखा उजगरे, डॉ.शरदचंद्र वानखेडे आदींनी यावेळी मते मांडली.