छत्रपती संभाजीनगर : एकीकडे गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिस आयुक्त मनोज लोहिया कसोशीने प्रयत्न करत असताना दुसरीकडे काही पोलिस ठाणी त्यांच्या या हेतूलाच हरताळ फासत आहेत. अनेक भागांमध्ये सर्रास चहा, सिगारेट, पुड्यांच्या टपऱ्या रात्री उशिरा सुरू राहत असून त्यातूनच सिडको बसस्थानकावर गुंडांनी धिंगाणा घातला. पार्किंगवरील कर्मचाऱ्याला मारहाण करून पैशांची मागणी केली. त्यानंतर तेथील केबिनच्या काचा फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
राहुल बनकर हा युवक सिडको बसस्थानकाच्या पार्किंगमध्ये नोकरी करतो. १७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री दीड वाजता तो रात्रपाळीवर असताना सोनू हिंगोले व विकी वाघ यांनी टोळीसह तेथे जात दारूसाठी पैशांची मागणी केली. राहुलने नकार दिला. तुम्ही पैसे कसे देत नाही, असे म्हणत बुक्क्यांनीच केबिनच्या काचा फोडल्या. तेवढ्यावरच न थांबता त्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली.
शहर बंद; मग येथील टपऱ्या सुरू कशा?एकीकडे शहरातील आस्थापना, हॉटेल, बार अकरा वाजता बंद होतात. गुन्हेगारी, टोळ्यांना आवर घालण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली. मात्र, सिडको बसस्थानकावर जनरल स्टोअर्सच्या नावाखाली दोन टपरीचालक तंबाखू, गुटखा, सिगारेट विकतात. रात्रीची वेळ म्हणून दुप्पट दराने विक्री करतात. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री पंधरा ते वीस तरुण एकाच वेळी टवाळक्या करत होते. गस्तीवरील पोलिसांचे वाहन आल्यानंतर टपरीचालकाने पाण्याच्या बाटल्या नेऊन देताच पोलिस तसेच लगेच निघून गेले. यामुळे येथे रात्री उतरणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा देखील धोक्यात आली आहे. मागील दोन महिन्यांत दहापेक्षा अधिक चोरी, लुटमारीच्या घटना येथे घडल्या आहेत.