लोकमत न्यूज नेटवर्कजालना : घनसांगी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी दारू बंदीचा ठराव घेऊन मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे. वारंवार सांगूनही कायस्वरुपी दारूबंदी होत नसल्यामुळे चार गावातील शंभरहून अधिक महिला सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालावर धडकल्या.घनसावंगी तालुक्यातील पानेवाडी, शिंदेवडगाव, सराफगव्हाण, भुतेगाव या गावांमध्ये सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी या मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी मे महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांना ग्रामसभेच्या ठरावासह दिले. मात्र, त्याबाबत अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे चारही गावातील संपप्त महिला सोमवारी दुपारनंतर थेट जिल्हाधिकारी कार्यालयात पोचल्या. गावात तात्काळ दारूबंदी करण्याची मागणी महिलांनी केली. अचानक मोठ्या संख्येने दाखल झालेल्या महिलांमुळे अधिकाऱ्यांसह पोलीस यंत्रणेची धावपळ झाली. आपल्या भावना व्यक्त करताना महिलांनी सांगितले, की गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे तरुणांमध्ये व्यसनाधिनता वाढत चालली आहे. अनेकांचे संसार उदध्वस्त झाले आहेत. पानेवाडी गावात पाच महिलांनी दारूच्या त्रासाला कंटाळून आपले जीवन संपवले. घनसावंगी पोलीस ठाणे, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊनही गावात अवैध दारू विक्री सुरूच आहे. काही ठिकाणी मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून चालविण्यात येणाऱ्या धाब्यांवर दिवस-रात्र अवैध दारूविक्री केली जाते. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुली, रसत्याने जाणाऱ्या महिलांना तळीरामांचा त्रास सहन करावा लागतो, असे महिलांनी सांतिले. त्यामुळे वरील गावातील दारूविक्री कायमची बंद करण्यात यावी, अशी मागणी महिलांनी निवेदनाद्वारे केली. निवेदनावर चार गावातील चारशेहून अधिक महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महिलांशी चर्चा करून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
दारूबंदी नावाला, विक्री साऱ्या गावाला
By admin | Published: June 19, 2017 11:48 PM