औरंगाबाद : तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते १७ जुलै २०१४ रोजी भूमिपूजन झालेले वंदे मातरम् सभागृह तब्बल आठ वर्षांनी पूर्णत्वास आले. ३ महिन्यांपूर्वी लोकार्पणाची तयारी झाली होती. मात्र, मुहूर्त न मिळाल्याने गेले ३ महिने कुलूपबंद असलेल्या वंदे मातरम् सभागृहाच्या लोकार्पणाला अखेर शुक्रवारचा मुहूर्त मिळाला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ९ डिसेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.
काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळात भूमिपूजन, मविआच्या काळात पूर्णत्वास आलेल्या सभागृहाचे शिंदे फडणवीस सरकारच्या काळात लोकार्पण होत आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांचा दोन दिवसांचा दौरा निश्चित झाल्याने दोन्ही विभागांतील अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर कार्यक्रमांच्या तयारीला सुरुवात केली आहे. लोकार्पणानंतर नवीन शैक्षणिक धोरणावर प्राध्यापकांचे उद्घाटन उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वंदे मातरम् सभागृहात होईल, असे उच्च शिक्षण सहसंचालक डाॅ. एस. एम. देशपांडे यांनी सांगितले.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सिफार्ट सभागृह येथे मंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्रशिक्षण संचालक अभय वाघ यांच्या उपस्थितीत उद्योजक आणि अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक, फार्मसी महाविद्यालयांच्या प्राचार्यांमध्ये उद्योगाच्या मनुष्यबळाच्या गरजा व अभ्यासक्रमातील बदलासंदर्भात चर्चा होणार आहे, अशी माहिती तंत्रशिक्षण सहसंचालक उमेश नागदेवे यांनी दिली. कार्यक्रम पत्रिका छापून झाल्या. मात्र, दौऱ्यातील वेळेत बदल होत असल्याने पत्रिका वाटण्याबद्दल बुधवारी सायंकाळपर्यंत संभ्रम होता.
या आहेत सुविधा...दोन एकर परिसर-८०३३.६७ चौ.मी.मध्ये चार मजली इमारतीत टेरेसवरील उद्यान, २ हाॅल, १ आर्ट गॅलरी, सभागृहात १०७६ आसन व्यवस्था असून, त्यापैकी ३०१ आसनांची गॅलरी आहे. २५० व्यक्तींची क्षमता असलेले ॲम्पिथिएटर, प्रदर्शन केंद्र, व्हीआयपींसाठी ५ रुम, ६ अतिथी कक्ष, १०० कार व २०० दुचाकींचे वाहनतळ, २ मेकअप रूम, ४ ग्रीन रूम, २ प्रॅक्टिस हॉल असून, १.०४ कोटींची अत्याधुनिक व ॲटोमॅटिक प्रकाशयोजना, साऊंड सिस्टीम, एचव्हीएसी, लिफ्ट आदी सुविधा आहेत. वंदे मातरम् सभागृहासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील स्थापन समिती सभागृह भाडेतत्त्वाने देण्याबाबतचा निर्णय घेणार आहे.
असा झाला प्रवास: १९८४-८५ - किलेअर्क येथे वंदे मातरम् सभागृहाची घोषणा१६ फेब्रुवारी २०१४ -प्राथमिक आराखड्यात मान्यता२६ फेब्रुवारी २०१४- बांधकामास मंजुरी१७ जुलै २०१४ -भूमिपूजन९ डिसेंबर २०२२ -लोकार्पण