परतूर : परतूर पोलिसांनी लग्नाला जाणारा वऱ्हाडीचा टेम्पो पकडून ठाण्यात लावल्याने वऱ्हाडी मंडळींनी ठाण्यातच ठिय्या मांडला. ठाण्यातच लग्न लावण्याचा निर्णय घेतल्याने, शेवटी पोलिसांनी नरमाईची भूमिका घेत टेम्पो सोडून दिला. परतूर तालूक्यातील पाटोदा माव येथील निवृत्ती मुंढे यांच्या मुलाचा विवाह सोहळा मंठा तालूक्यातील माळतोंडी येथे होता. या विवाह सोहळयासाठी जाणारा वऱ्हाडीचा टेम्पो परतूर पोलिसांनी रेल्वेगेटवर अडवून सकाळी ११ वाजता पोलिस ठाण्यात आणला. वराकडील मंडळींनी विनंती करूनही पोलिस निरीक्षक योगीराजसिंह शेवगण यांनी टेम्पो सोडण्यास नकार दिला. त्यावर वऱ्हाडातील महिला, पुरूष व लहान बच्चे कंपनीने ठाण्यातच ठिय्या मांडला. यावरही पोलिसांनी टेम्पो सोडण्यास नकार दिला. मानवाधिकारचे जिल्हाध्यक्ष अर्जुन पाडेवार, कॉ. मारोती खंदारे यांनी पोलिसांना विनंती केली. परंतु टेम्पो न सोडल्याने संतप्त वऱ्हाडी मंडळींनी वधुसह नातेवाईकांना बोलावून ‘ठाण्यातच’ लग्न लावण्याचा निर्णय घेतला. वऱ्हाडीच्या या भूमिकेने पोलिस नरमले. नंतर लग्नाचा टेम्पो सोडून दिला. मात्र दुपारी १२ वाजेचे लग्न पोलिसांच्या या भूमिकेमुळे चार वाजता लागले. एकीकडे परतूर तालूक्यात जुगार, अवैध वाहतूक, छुपा मटका, अवैद्य दारू विक्री सर्रासपणे सुरू असताना पोलिस गोरगरीब व सर्वसामान्यांना त्रास देत आहेत. पोलिसांनी अगोदर हे फोफावलेले धंदे बंद करावेत, अशीही मागणी मानवाधिकारचे अर्जून पाडेवार यांनी केली आहे. (वार्ताहर)
लग्नाच्या वऱ्हाडाचा टेम्पो दोन तास पोलिस ठाण्यात
By admin | Published: November 07, 2014 12:26 AM