औरंगाबाद : खंडणीसाठी वर्धनचे अपहरण करून खून करणाऱ्या अभिलाष मोहनपूरकर आणि श्याम मगरे यांना न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. खुनाच्या या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना सीसीटीव्ही, मोबाईलचे कॉल डिटेल्स आणि टॉवर लोकेशनची पोलिसांनी जुळविलेली साखळी आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या अहवालामुळे आरोपींना शिक्षा झाली. आपण केसमधून सुटून बाहेर येऊ, अशी मानसिकता बाळगून गुन्हे कराल तर खबरदार, असा इशारा पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.
पोलीस आयुक्त म्हणाले की, पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक काशीनाथ महांडुळे, उपनिरीक्षक कोपनर, कर्मचारी सुनील बडगुजर, सुनील फेपाळे, नवाब पठाण, काळे आणि वीरेश बने यांच्या पथकाने सर्वाेत्तम तपास करून न्यायालयासमोर दोषारोपपत्र सादर केल्याने वर्धनच्या नातेवाईकांना न्याय मिळाला. येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळा अद्ययावत झाल्याने डीएनए चाचणीही औरंगाबादेत होत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आपल्याला शिक्षा होणार नाही, असे समजून गुन्हे करीत असतील, तर खबरदार, सीसीटीव्ही आणि मोबाईल टॉवर लोकेशन, मोबाईल कॉल डिटेल्स अशा तांत्रिक पुराव्याच्या आधारेसुद्धा आरोपींना शिक्षा होऊ शकते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे आयुक्तांनी सांगितले.
मुलांच्या चुकांकडे दुर्लक्ष करणे धोक्याचेपोलीस आयुक्त म्हणाले की, मुलांचे संगोपन करीत असताना त्यांच्या अवास्तव मागण्या मान्य करणे, त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करण्याने मुलांची गुन्हेगारी मानसिकता तयार होते. वर्धनची हत्या करणाऱ्या वीस वर्षीय अभिलाषकडे स्पोर्टस् कार, ब्रँडेड बुटांचे आणि जॅकेटस्, कपड्यांचे अनेक जोड होते. यावरून पालक त्याला हवे ते देत होते, मात्र त्याच्या वर्तणुकीकडे ते लक्ष देत नव्हते, हे आता सिद्ध झाले आणि वर्धनसोबत त्याची हत्या करणाऱ्या कुटुंबांचेही नुकसान झाले.
पोलीस आयुक्तांकडून सत्कारया केसमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल अॅड. अजय मिसर, तपास अधिकारी निरीक्षक अविनाश आघाव, निरीक्षक मनीष कल्याणकर आणि उपनिरीक्षक महांडुळे यांचा पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
पोलिसांचे आभार...विविध खेळांमध्ये पारंगत असलेला एकुलता वर्धन शाळेतही हुशार होता. त्याच्या खुन्यांना न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली, त्यावर मी समाधानी आहे. पोलीस निरीक्षक कल्याणकर, अविनाश आघाव, उपनिरीक्षक महांडुळे आणि अॅड. मिसर यांची मी आभारी आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आरोपींना शिक्षा झाली.- भारती घोडे, वर्धनची आई