औरंगाबाद : शहरालगतच्या हिंदुस्तान आवास योजना वसाहतीत रस्ते, वीज, पाणी यासारख्या नागरी मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव आहे. ना धड रस्ते, ना सुरळीत वीज पुरवठा, ना पिण्याच्या पाण्याचा पत्ता अशी गत याठिकाणी बघायला मिळते.
या वसाहतीत विद्युत पुरवठ्यामध्ये वारंवार व्यत्यय येत आहे. पावसाळ्यात तर साप निघत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. लोकवस्ती वाढल्याने पथदीपांची संख्याही वाढणे गरजेचे आहे. विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन अध्ययनामध्ये मोठा व्यत्यय येतो.
या वसाहतींमधील नागरिकांची तहान भागविण्यासाठी लाखो रुपये खर्चून जलकुंभ बांधला खरा पण या जलकुंभाला दीड दशकापासून पाण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे नागरिकांना सामूहिक पद्धतीने कूपनलिका घेऊन तेच पाणी शुद्ध करून पिण्याशिवाय पर्याय नाही. महानगरपालिकेचे पिण्याच्या पाण्याचे टँकरसुद्धा येत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
वाल्मी नाका ते बजाज गेट या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. या वसाहतींमधून कामगार वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये ये-जा करत असतात. परंतु, खड्डेमय रस्त्याचे विघ्न मात्र काही सुटत नाही. मोठमोठ्या खाच-खळग्यातूनच नागरिकांच्या वाहनांची आदळआपट होत आहे. शिवाय या रस्त्यावरुन दिवस-रात्र अवजड वाहतूकसुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू असते. मुख्य पाईपलाईनला नेहमीच गळती लागत असल्याने शेतात पाणीच पाणी साचत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.