लोकमत न्यूज नेटवर्कबीड : नियमांच्या आडून जिल्ह्यातील ३० हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रोखून धरणाऱ्या कोषागार अधिकाऱ्यांना शुक्रवारी विविध संघटनांनी चांगलेच धारेवर धरले. संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कोषागार अधिकारी व सहायक आयुक्त यांना समोरासमोर आणून पर्याय काढण्याची मागणी केली. यावेळी संघटनांनी कोषागार कार्यालयाविरोधात संताप व्यक्त केला.‘जिल्ह्यातील ३० हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून ही बाब निदर्शनास असणून दिली. त्यानंतर शुक्रवारी विविध संघटना चांगल्याच आक्रमक झाल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांना २०१६-१७ ची शिष्यवृत्ती अद्याप मिळाली नसल्याने त्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तसेच कोषागार अधिकारी हे समाजकल्याणच्या कामात ढवळाढवळ करून विद्यार्थ्यांना वेठीस धरीत असल्याचे समोर आले होते. शुक्रवारी विविध संघटनांनी समाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त आर.एम.शिंदे व कोषागार अधिकारी भुतडा यांना समोरासमोर आणून विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. यावेळी शिंदे यांनी आपण संपूर्ण कागदपत्रांची पुर्तता केल्याचे सांगितले. मात्र, कोषागार कार्यालयाने बिलच काढले नसल्याचे समोर आले. यावर संघटना अधिकच आक्रमक झाल्या. दोन दिवसात शिष्यवृत्तीचे बिल पास करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर संघटना माघारी परतल्या. यावेळी प्रा.प्रदीप रोडे, दिगंबर गंगाधरे, गव्हाणे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी विविध संघटना आक्रमक
By admin | Published: July 15, 2017 12:38 AM