---------------------
बजाजनगरात रक्तदान शिबिर
वाळूज महानगर : बजाजनगरातील मोहटादेवी चौकात शुक्रवारी (दि.११) आयोजित रक्तदान शिबिरात १८ जणांनी स्वयंस्फूर्तपणे रक्तदान केले. स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिर यशस्वीतेसाठी अमोल ताठे, किशोर देशमुख, गोविंद भाले, प्रशांत ताठे आदींसह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
------------------
रांजणगावातून दुचाकी लांबविली
वाळूज महानगर : रांजणगावातून कामगाराची २५ हजारांची दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिलाल सोमारी प्रसाद यांनी ७ डिसेंबरला रात्री दुचाकी (एमएच-२० डीयू-८०९३) ही घरासमोर उभी केली होती. रात्रीच्या वेळी चोरट्याने दुचाकी चोरून नेली.
------------------
लग्नासाठी गेलेला युवक बेपत्ता
वाळूज महानगर : मित्रासोबत लग्नाला पैठणला जातो, असे म्हणून घराबाहेर पडलेला २१ वर्षीय युवक बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या आईने पोलीस ठाण्यात दिली आहे. राम राजेश सुरासे (२१, रा. बजाजविहार परिसर) हा ९ डिसेंबरला मित्रासोबत पैठणला लग्नाला चाललो, असे म्हणून घराबाहेर पडला होता. मात्र, तो घरी न परतल्यामुळे राम याची आई वंदना सुरासे हिने मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिली आहे.
----------------
छतावरून पडल्याने अल्पवयीन मुलाचा मृत्यू
वाळूज महानगर : राहत्या घराच्या छतावरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.११) सकाळी ११ वाजेच्या सुमारास सिडको वाळूज महानगरात घडली. हर्षल कैलास ललवाणी (१५, रा. सिडको परिसर) हा शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास इमारतीच्या छतावर गेला होता. छतावरून तोल जाऊन पडल्याने हर्षल हा गंभीर जखमी झाला. हा प्रकार लक्षात येताच नातेवाइकांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी दुपारी १२ वाजेच्या सुमारास हर्षलला मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
------------------