बीड : लोकसभा निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासंदर्भात त्यांच्या कार्यकर्त्याने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हे कृत्य विरोधकांनी केल्याचा आरोप हिंगे यांनी केला असून, चौकशी करून कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
बीड लोकसभा निवडणुकीचे वातावरण आता तापू लागले आहे. १८ एप्रिलपासून नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात होणार आहे. काही पक्षांनी उमेदवारही जाहीर केले आहेत. याच निवडणुकीसाठी अशोक हिंगे यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. ते सध्या प्रचारात असतानाच त्यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ तीन ते चार दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात हिंगे हे डान्स करताना दिसत असून, बाजूला काही महिला आहेत. याच व्हिडीओखाली आक्षेपार्ह कॅप्शन देऊन हिंगे यांना बदनाम केले जात असल्याचा आरोप फिर्यादीत ज्ञानेश्वर कवठेकर यांनी केला आहे.
तक्रार देताना त्यांनी व्हिडीओसाेबतच सोशल मीडियावरील पोस्टचे स्क्रीनशॉटही पोलिसांना दिले आहेत. सायबर पोलिसांकडून याचा तपासही सुरू करण्यात आला आहे. सध्या तरी अज्ञात चार लोकांविरोधात गुन्हा दाखल असून, यात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पोलिस निरीक्षक देविदास गात, उपनिरीक्षक शैलेश जाेगदंड हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
गुन्हा दाखल केलासोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ आमच्या घरगुती कार्यक्रमातील आहे. तो साधारण १५ ते २० वर्षांपूर्वीचा आहे. विरोधकांकडून केवळ राजकीय द्वेषातून तो व्हायरल करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच आम्ही सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला आहे. याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.-अशोक हिंगे, उमेदवार, वंचित बहुजन आघाडी.