औरंगाबाद : प्रामुख्याने पदवी अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांमध्ये पदव्युतरचेही अभ्यासक्रम शिकविले जातात, अशी महाविद्यालये विद्यापीठाच्या रडारवर आहेत. जिथे पायाभूत सुविधांचा अभाव, नियमित प्राचार्य व अध्यापकांची नियुक्ती नाही, अशा संशयित महाविद्यालयांची यादी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे असून तपासणीसाठी समित्या स्थापन करण्याची लगबग सुरू आहे.
तथापि, तपासणीमध्ये त्रुटी आढळून आल्यास अशा महाविद्यालयांची संलग्नता रद्द करण्यात येणार आहे. विद्यापीठ कायदा व यूजीसीच्या नियमानुसार महाविद्यालयांमध्ये पुरेशी इमारत, अद्ययावत वर्गखोल्या, अद्ययावत प्रयोगशाळा, नियमानुसार वर्गखोल्या, क्रीडांगण, वसतिगृहे, विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र स्वच्छागृहे, अद्ययावत ग्रंथालय, पुरेशी पुस्तके, नियमित प्राचार्य व अभ्यासक्रमनिहाय अध्यापकांची नियुक्ती, ‘नॅक’ मूल्यांकन कक्ष, इंटरनेट सुविधा, राष्ट्रीय बँकेमार्फत आर्थिक व्यवहार, केंद्र सरकारकडून प्राप्त अनुदान व उपयोगीता, महाविद्यालयाने केलेल्या संशोधन कार्याबाबतचा तपशील आदी बाबी आहेत का, याची वस्तुनिष्ठ तपासणी केली जाणार आहे. यासाठी प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली किमान दहा समित्या स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
कुलगुरू ‘ॲक्टिव्ह मोडवर’शैक्षणिक व पायाभूत सुविधा नसतानाही अनेक महाविद्यालयांतून पदवी व पदव्युतर अभ्यासक्रम शिकविले जातात. प्रवेश घ्या आणि परीक्षेलाच या, या तत्त्वावर काही महाविद्यालये सुरू असल्याच्या अंसख्य तक्रारी विद्यापीठ प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्याची खातरजमा करण्यासाठी कुलगुरु डॉ. येवले यांनी अचानकपणे खुलताबाद येथील कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास भेट देऊन पायाभूत सुविधा व इतर बाबींची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी समितीद्वारे पाहणी केली तेव्हा अनेक अनियमितता आढळून आल्या असून महाविद्यालय व्यवस्थापनाला ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्यात आली आहे. कुलगुरू आता ‘ॲक्टिव्ह मोडवर’ असून किमान दहा महाविद्यालयांची तपासणी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.