औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्राध्यापक संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी ‘नॅक’चा उत्कृष्ट दर्जा मिळाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत विद्यापीठातील प्राध्यापकांविषयी अवमानकारक वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा संघटनेतर्फे ठराव घेऊन निषेध नोंदविण्यात आला आहे.
कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी ‘नॅक’चा निकाल जाहीर झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत विद्यापीठाच्या संशोधनाचा घसरलेल्या दर्जावर प्रतिक्रिया देताना विद्यापीठातील प्राध्यापक जर हिरे असते तर त्यांना पैलू पाडले असते. ‘घोड्याला पाण्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो, पाणी प्यायचे की नाही, हे घोडाच ठरवू शकतो’ असे धक्कादायक वक्तव्य केले होते.
या वक्तव्यावर विद्यापीठ प्रशासनातर्फे अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. ‘नॅक’मध्ये यश मिळण्यासाठी प्राध्यापकांसह कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र मेहनत घेतली. त्यामुळे विद्यापीठाला ‘अ’ दर्जा मिळाला आहे. तरीही कुलगुरू प्राध्यापकांविषयी अशा पद्धतीचे वक्तव्य करतात, हे दुर्दैवी आहे. या कुलगुरूंच्या वक्तव्याचा बामुटा संघटनेतर्फे जाहीर निषेध नोंदवत असल्याचे प्रसिद्धीपत्रक संघटनेतर्फे जाहीर करण्यात आले आहे. पत्रावर अध्यक्ष डॉ. रत्नदीप देशमुख, उपाध्यक्ष प्रा. बी. एन. डोळे, सचिव डॉ. स्मिता अवचार आणि कोषाध्यक्ष डॉ. अमोल खंडागळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.