छत्रपती संभाजीनगर : पावसाळा सुरू होताच सर्वांना वेध लागतात ते गणेशोत्सवाचे. याला आता अवघे ८० दिवस शिल्लक आहेत. शहरातील मूर्तिकार गणरायाला साकारण्यात मग्न आहेत. आतापर्यंत ७० टक्के मूर्ती तयार झाल्या आहेत.
७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवयंदा ७ ते १७ सप्टेंबर यादरम्यान गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. ११ दिवसांच्या या गणेशोत्सवासाठी गणेश मूर्ती बनविण्यास वेग आला आहे. पावसाळ्यात मूर्ती सुकण्यासाठी वेळ लागतो. यासाठी शहरातील मूर्तिकारांनी उन्हाळ्यातच ७० टक्के मूर्ती तयार केल्या आहेत. आता जुलै महिन्यात रंगरंगोटीला सुरुवात होणार आहे.
शहरात १ लाख ७५ हजार मूर्तींची आवश्यकताशहरात दरवर्षी १ लाख ७५ हजार गणेश मूर्तींची आवश्यकता असते. त्यातील सव्वा लाख मूर्ती शहरातील लहान-मोठे मूर्तिकार बनवितात. उर्वरित ५० हजार मूर्ती परजिल्ह्यातून येतात.
रामलल्लाच्या रूपातील गणेश मूर्ती आकर्षणदरवर्षी मूर्तिकार वेगवेगळ्या रूपातील गणेश मूर्ती तयार करीत असतात. अयोध्येतील रामलल्लाच्या रूपातील गणेशाची मूर्ती यंदाचे आकर्षण राहणार आहे. तसेच पारंपरिक दगडूशेठ हलवाई, लालबागचा राजा, कसबा गणपतीच्या मूर्ती सर्वाधिक विक्री होतात. अनेकजण मांडी घातलेला गणपतीची मूर्ती खरेदी करणे पसंत करतात.
यंदा कच्च्या मालाच्या किमतीत वाढ नाहीमूर्ती घडविण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा शाडू माती तसेच रंगाची आवश्यकता आहे. यंदा कच्च्या मालामध्ये अजूनपर्यंत भाववाढ झाली नाही. यामुळे मूर्तीचे भाव स्थिर आहेत. प्रत्येक मूर्तिकार लहान व मध्यम आकारातील हजार ते दोन हजार मूर्ती घडवत असतो. यातील ७० टक्के मूर्ती तयार झाल्या आहेत.-गणेश बगले, मूर्तिकार
शहरात कुठे तयार होताहेत मूर्ती?बेगमपुरा, औरंगपुरा, मुकुंदवाडी, चिकलठाणा, पुंडलिकनगर, अरिहंतनगर, विष्णूनगर, जवाहर कॉलनी (मेहरनगर), सातारा परिसरात मिळून वर्षभर मूर्तिकाम करणारे ५० पेक्षा अधिक मोठे मूर्तिकार आहेत. याशिवाय ५० ते १०० मूर्ती तयार करणाऱ्या हौशी मूर्तिकारांची संख्याही २० पेक्षा अधिक आहे.