तुळजापूर : शारदीय नवरात्रोत्सवात नऊ दिवस चाललेल्या विविध देवतांचे पोथी वाचन, पूजन यांचे पौरोहित्य येथील उपाध्ये करीत असून, याची सांगता रविवारी दुर्गाष्टमीदिवशी होमावरील कोहळ्याच्या पूर्णाहुतीने झाली. यावेळी उपस्थित भाविकांनी ‘आई राजा उदो उदोऽऽ’ चा जयघोष केला. यानंतर होमकुंड पुढील धार्मिक विधीसाठी प्रज्वलीत झाले. रविवारी सायंकाळी सव्वापाच वाजता मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे व त्यांच्या पत्नी प्रियंका नारनवरे यांच्या हस्ते होमकुंडासमोर वैदीक होमास प्रारंभ झाला. प्रारंभी नारनवरेदाम्पत्यांनी होमकुंडाची विधीवत पूजा केली. यानंतर होमहवनासाठी अग्नि प्रज्वलीत करण्यात आल्या. पुण्याहवाचन, गणेश स्तवन, तुळजाभवानी सहस्त्रनाम, दुर्गा सप्तपदीपाठ, भवानी सहस्त्रनाम, नवग्रह जप आदींचे हवन झाल्यानंतर महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती व नवग्रहाची या दाम्पत्याच्या हस्ते स्थापना करण्यात आली. रात्री कोहळ्याने होमावरील पुर्णाहुती सोहळा पार पडला. याचे पौरोहित्य शासकीय उपाध्ये बंडोपंत पाठक, श्रीकृष्ण अंबुलगे, दिनकर प्रयाग, अनंताचार्य कांबळे, श्रीराम अपसिंगेकर, वेदशास्त्री राजेश नंदीबुवा, मुकुंद कमठाणकर आदी ब्रह्मवृंदांनी केले. यावेळी विश्वस्त निलेश श्रींगी, तहसीलदार सुजीत नरहरे, अपर पोलिस अधीक्षक दीपाली घाडगे, उपाध्ये अनंत कोंडो, भोपे पुजारी अमर परमेश्वर, पुजारी मंडळाचे सुधीर रोचकरी, दिलीप नाईकवाडी आदी उपस्थित होते.
वैदिक होमहवनास विधीवत पूर्णाहुती
By admin | Published: October 10, 2016 12:17 AM