औरंगाबाद : राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवरून ये-जा करताना फास्टॅगद्वारे टोलची रक्कम आकारण्यात येणार आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयाकडे फिटनेस तपासणीसाठी येणाऱ्या प्रवासी आणि मालवाहू वाहनांना फास्टॅग असेल, तर तपासणी केली जात आहे. फास्टॅगशिवाय फिटनेस प्रमाणपत्र दिले जात नाही. परिणामी, फास्टॅग वाहनांना लावले जात आहे; परंतु फास्टॅगच्या नेमक्या वापराविषयी वाहनचालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
भूपृष्ट वाहतूक मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गांवरील फास्टॅग व्यवस्थेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनचालकांना टोलनाक्यांवर इलेक्ट्रिॉनिक पेमेंटसाठी फास्टॅग बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व राष्ट्रीय महामार्गांवर टोलनाक्यांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल घेतला जाणार आहे. त्यासाठी वाहनांवर फास्टॅग लावावा लागत आहे. फास्टॅग अधिकृत टॅग विक्रेता, बँकांच्या माध्यमातून देण्यात येत आहे. वाहनांवर फास्टॅग लावण्यात येत आहे. वाहन टोलनाक्यावर पोहोचताच तेथील सेन्सरवर ‘फास्टॅग’ची नोंद होईल आणि फास्टॅग खात्यातून टोलची रक्कम वजा होईल. वाहनांच्या प्रकारानुसार वेगवेगळे फास्टॅग आहेत.
एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात एकूण ६०० च्या जवळपास बस आहेत. औरंगाबाद विभागातील बहुतांश एसटी बसला फास्टॅग लावून घेतले आहेत. आरटीओ कार्यालयातर्फे करोडी येथे वाहनांची फिटनेस तपासणी केली जाते. शिवाय नवीन वाहनांची नोंदणी करतानाही फास्टॅग बंधनकारक करण्यात आले आहे. फिटनेस तपासणी गरजेचे असल्याने वाहनांना लावलेही जात आहे. त्यासाठी ५०० ते १२०० रुपये मोजण्याची वेळ वाहनधारकांवर येत आहे; परंतु अनेक वाहने महिनोन्महिने टोलनाका ओलांडतही नाही. शहरातच वाहन चालविले जाते. मालवाहतूक केवळ जिल्ह्याच्या हद्दीत केली जाते. कधी तरी टोलनाका ओलांडावा लागेल. त्यामुळे फास्टॅग का लावायचा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कार्यालयाकडून अंमलबजावणीआरटीओ कार्यालयातर्फे फास्टॅगची यापूर्वीच अंमलबजावणी केली जात आहे. फिटनेससाठी येणाऱ्या चारचाकी वाहनांची फास्टॅगशिवाय फिटनेस तपासणी केली जात नाही. तीनचाकी वाहने, शासकीय वाहनांना फास्टॅग लागू नाही. नव्या वाहनांची नोंदणी होतानाही फास्टॅगची पडताळणी केली जाते.- स्वप्नील माने, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी