औरंगाबाद : औरंगाबाद स्मार्ट शहराच्या दिशेने वाटचाल करत आहे. वाहनामुळे होणारे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी सीएनजी पंप ( कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस ) येत्या काही दिवसांत सुरू होत आहे. सीएनजी मिळण्यास सुरुवात झाल्या नंतरच शहरात नामांकित कंपन्यांच्या सीएनजीवर धावणाऱ्या कार उपलब्ध होतील.
लोकमतच्या १० फेबुवारीच्या अंकात '' औरंगाबादेत होणार आठ ते दहा सीएनजी पंप'' ही बातमी प्रसिद्ध झाली आणि शहरातील कार वितरकाकडे सीएनजीवर चालणाऱ्या कार संदर्भात ग्राहकांनी चौकशी सुरू केली. मारुती, हुंदई आधी कंपन्या सीएनजीवर चालणाऱ्या कार उत्पादक आहेत. ज्यांना जुनी कार किंवा रिक्षांना सीएनजी किट बसवून घ्यायचे आहे, त्यांना कंपन्यांच्या अधिकृत वितरकांशी संपर्क साधावा लागणार आहे. वितरकांनी सांगितले की, सीएनजी हे पेट्रोल, डिझेलपेक्षा स्वस्त मिळते व जास्त मायलेज मिळते. यामुळे सीएनजीकडे कल वाढत आहे. दिल्ली, मुंबई, नागपूर, नाशिक, लातूर येथे सीएनजी पंप सुरू झाले. त्यातुलनेत औरंगाबादमध्ये उशिराने सीएनजी पंप सुरू होत आहे. कार, आटोरिक्षाचालकांना सीएनजी फायदेशीर आहे. ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्यांना किट बसून घ्यावे लागणार आहे. तसेच कंपन्यांनी पर्यायही उपलब्ध करून दिले आहेत. पेट्रोलपंपचालकांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या धोरणानुसार साधे पेट्रोल, डिझेल, पॉवर पेट्रोल, एलपीजी, सीएनजी व ई वाहनासाठी बॅटरी चार्जिंग सेंटर एकाच पेट्रोल पंपावर उपलब्ध करून देण्यात यावे, त्यादृष्टीने शहरातील व शहराबाहेरील पेट्रोलपंप आता सीएनजी पंप सुरू करत आहेत.
चौकट
दोन प्रकारांत उपलब्ध होतील किट
वाहनाला बसविण्यासाठी सीएनजी किटमध्ये दोन प्रकार आहेत. यात वेंचुरी सीएनजी किट हे साधे किट असते. ते बसविण्यासाठी अंदाजे २५ ते ४५ हजार रुपये खर्च येऊ शकतो, तर दुसरे सिक्वेशियल सीएनजी किट हे आधुनिक किट असून, अंदाजे ५० ते ७० हजार रुपये दरम्यान या किटची किंमत असेल.
चौकट
सीएनजी वाहनांची झाली सुरू चौकशी
सीएनजी पेट्रोल पंप शहरात सुरू होणार याची बातमी प्रसिद्ध होताच. कार व रिक्षा वितरकाकडे ग्राहकांनी सीएनजी वाहनाची चौकशी सुरू केली आहे. सीएनजी पंप सुरू झाल्यानंतर वाहने उपलब्ध होतील.
राहुल पगारिया
माजी अध्यक्ष, चेंबर ऑफ आथोराईज ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन