छत्रपती संभाजीनगर : अपघात, चोरी, दंड किंवा अन्य कारणांमुळे पोलिस ठाणे, आयुक्तालयासह आरटीओ कार्यालयात जप्त केलेली लाखो रुपयांची वाहने खराब होऊन निकामी झाली आहेत. अनेक वाहनांचे भागही गायब झाले असून, किचकट कायदेशीर प्रक्रियेमुळे त्याचे करायचे काय, असा प्रश्न ठाणेदारांसमोर आहे.
अपघात, चोरी, नियमबाह्य कामादरम्यान अनेक वाहने जप्त करण्यात येतात. परंतु, काही प्रकरणांत वाहनांचा दावेदारही येत नसल्याने ठाण्यांच्या आवारातील वाहने खराब होण्याची वेळ आली आहे. जवळपास एक हजार वाहने झाडेझुडपे व वेलीने पांघरली असून, वाहनांवर गंज चढला आहे. वाढलेल्या झाडाझुडपांमुळे ठाण्याच्या आवारात साप, किड्यांचे प्रमाणही वाढले आहे. गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेली वाहने संबंधित मालक नेऊ शकतो. मात्र, बेवारस वाहनांमध्ये मालक शोधण्यात अडचणी येतात.
चार वर्षांपूर्वी शेवटचा लिलाव२०२० मध्ये तत्कालीन पाेलिस उपायुक्त निकेश खाटमोडे यांनी परिमंडळ एकच्या आठ ठाण्यांमधून पावणेचारशे, तर राहुल खाडे यांनी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याच्या आवारातील ७६ बेवारस वाहनांचा लिलाव केला होता. काही न्यायालयाच्या परवानगीने नष्ट करण्यात आली होती.
तीन प्रकारची होतात जमा गुन्ह्याशी संबंधित वाहने-बेवारस वाहने.- इतर सरकारी विभागांच्या कारवाईतील वाहने.-काही ठाण्यांच्या आवारात २००३ पासूनचे ट्रक, टेम्पो आहेत.पोलिसांच्या माहितीनुसार, एमआयडीसी सिडको, सिडको, क्रांतीचौक, एमआयडीसी वाळुज, वाळुज ठाण्यांच्या आवारात मोठ्या प्रमाणात वाहने पडून आहेत.
अधिकार पोलिसांना- मुंबई पोलिस कायदा ८७ अंतर्गत पोलिसांना दावेदार नसलेले, वर्षानुवर्षे पडलेली वाहने विकण्याचा अधिकार आहे. ठरावीक कालावधीची नोटीस बजावून लिलाव करता येतो, अशी वाहने पुन्हा वापरात येऊ नयेत, अशी परिवहन विभागाची अट आहे.- न्यायालयाच्या परवानगीने पुन्हा वाहन मिळवताही येते. कागदपत्र, ठोस पुरावे नसल्याने ही वाहने पडून राहतात. अपघातात जवळची व्यक्ती ठार झाल्यासही कुटुंब वाहन नेणे टाळतात.- २००९ पूर्वीचे रेकॉर्ड संगणकीकृत नसल्याने त्यात जुन्या वाहनांचे मालक शोधण्यात अडचणी येतात.