कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पैठण तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून तालुक्यातील जनतेची धाकधूक वाढली आहे. पैठण येथे समाजकल्याण मुलींचे वसतिगृहात प्रशासनाने कोविड सेंटर थाटले आहे. या कोविड सेंटरमध्ये ७३ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. कोविड सेंटरमधील रुग्णांना गोळ्या औषधी मिळत नाहीत. रुग्णांना नातेवाईकांमार्फत बाहेरून गोळ्या विकत आणाव्या लागत आहेत. रुग्णांचा ऑक्सिजन सफाई कामगार तपासतात. रुग्णांची देखभाल केली जात नाही, असे कोविड सेंटर मधील रुग्ण उपस्थित डॉक्टरांकडे तक्रार करीत होते. उपस्थित डॉक्टर व रुग्णांत या वेळी शाब्दिक चकमकी झडल्या. या सर्व घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने रविवारी पैठण शहरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला. तसेच या कोविड सेंटरची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
आरोग्य मंत्र्यांना कल्पना देणार
पैठण शहरातील कोविड सेंटर मधील प्रकार समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका संपर्क प्रमुख दत्ता गोर्डे,
भाजपाचे तालुका प्रमुख डॉ. सुनील शिंदे, कल्याण गायकवाड यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कल्पना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी याबाबत चर्चा करून कोविड सेंटरमध्ये सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करुन असे दत्ता गोर्डे यांनी सांगितले.