औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील नेत्ररोग विभागातील आॅपरेशन थिएटरच्या डागडुजीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. तीन महिन्यांपासून सुरू झालेले हे काम लांबत असल्याने तेथील शस्त्रक्रिया पूर्णपणे रखडल्या आहेत. घाटी रुग्णालयाच्या स्थापनेपासूनच नेत्ररोग विभागात मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि नेत्ररोगासंबंधी उपचार केले जातात. तज्ज्ञ डॉक्टर मंडळीसोबतच अत्याधुनिक यंत्रणा तेथे उपलब्ध आहे. खाजगी रुग्णालयापेक्षाही सरस यंत्रणा घाटीत असल्याने रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसह अन्य उपचारांसाठी घाटीलाच पसंती देतात. अशा या महत्त्वपूर्ण विभागाच्या बाह्यरुग्ण विभागात रोज साधारणत: ४० ते ७० नवीन रुग्ण दाखल होतात. या विभागासाठी अत्याधुनिक आॅपरेशन थिएटर आहेत. रोज साधारणत: २० रुग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टी प्रदान करण्याचे काम डॉक्टर करीत असतात. आॅपरेशन थिएटरमध्ये पाण्याची गळती लागलेली होती. त्यामुळे गतवर्षी हे थिएटर अनेकदा बंद ठेवावे लागले. याशिवाय वातानुकूलित यंत्रणेतही वारंवार बिघाड होत असल्याने डॉक्टरांना आॅपरेशन करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. काही दिवस उलटताच पुन्हा पाणी गळती किंवा इतर काही कारणांमुळे शस्त्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय डॉक्टरांना घ्यावा लागतो. दरम्यान, घाटी प्रशासनाने आॅपरेशन थिएटरची पूर्णपणे डागडुजी करण्याचा निर्णय घेतला. सार्वजनिक बांधकाम विभागाने फेब्रुवारी महिन्यात दुरुस्तीचे काम हाती घेतले. महिनाभरात काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, बांधकाम विभागाचे काम कासवगतीने सुरू असल्याने रुग्णांचे हाल सुरू झाले आहेत. तीन महिन्यांपासून नेत्ररोग विभागात होणार्या शस्त्रक्रिया बंद झाल्या आहेत. सूत्रांनी सांगितले की, सरासरी रोज १५ ते २० शस्त्रक्रिया नियमित होतात. आॅपरेशन थिएटर बंद झाल्यापासून रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पुढील तारीख (अपॉइंटमेंट) दिली जात आहे. रुग्णांना डॉक्टरांचा मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे. अपॉइंटमेंटच्या दिवशी घाटीत येण्यापूर्वी डॉक्टरांना फोन करून यावे, असे सांगितले जात आहे. याविषयी बोलताना वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी.एल. गट्टाणी यांनी नेत्ररोग विभागाच्या आॅपरेशन थिएटरचे काम आठ दिवसांत पूर्ण होईल असे सांगितले. (लोकमत ब्युरो) आॅपरेशन थिएटरमध्ये व्हेंटिलेशनची सुविधा नसते, अशा परिस्थितीत बंद पडणार्या वातानुकूलित यंत्राबाबत तक्रारी केल्यानंतर संबंधित विभागाकडून थातुरमातुर दुरुस्ती केली जाते.
घाटीत नेत्र रुग्णांच्या शस्त्रक्रिया रखडल्या
By admin | Published: May 17, 2014 12:58 AM