औरंगाबाद : मागील काही वर्षांमध्ये शहराच्या प्रदूषणात प्रचंड वाढ होत आहे. वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी महापालिकेने काही भागात व्हर्टिकल गार्डन विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाने महापालिकेला हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी १६ कोटी रुपयांचा निधी दिला असून, त्यातून व्हर्टिकल गार्डन विकसित केले जाणार आहेत. यासोबतच विविध भागांत कारंजेही सुरू केले जाणार असल्याची माहिती प्रशासक अस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली.
एमआयडीसी भागातील कंपन्यांमुळे जमिनीतील पाणी दोन दशकांपूर्वीच खराब झाले. वायू प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचले. शहरातही हवेतील धुळीचे कण वाढल्याने चिंता व्यक्त केली जात होती. प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेतर्फे प्रयत्न केले जात आहेत. केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत महापालिकेने खुल्या जागांवर हजारो झाडे लावून ऑक्सिजन हब तयार केले आहेत. हर्सूल तलाव परिसरात जांभूळबन विकसित करण्यात आले आहे. त्यासोबत आता दिल्लीच्या धरतीवर व्हर्टिकल गार्डन विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे महापालिकेचे प्रशासक यांनी पत्रकारांना सांगितले. देशातील अनेक शहरांमध्ये व्हर्टिकल गार्डन तयार करण्यात आले आहेत. औरंगाबादेत मात्र अद्याप एकही व्हर्टिकल गार्डन नाही. केंद्र शासनाने शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी १६ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून व्हर्टिकल गार्डन विकसित केले जातील. सोबतच काही ठिकाणी पाण्याचे कारंजे सुरू केली जातील. जेणेकरून हवेतील धुळीचे कण कमी होतील.
उड्डाणपुलाच्या भिंतीचा उपयोगशहरातील उड्डाणपुलांच्या भिंती, रस्त्यालगतच्या संरक्षण भिंतीचा वापर करून व्हर्टिकल गार्डन विकसित केले जाणार आहेत. लवकरच यासंदर्भात प्रस्ताव तयार केला जाणार आहे.
दहा कोटी रुपये ड्रेनेजसाठीमहापालिकेने भूमिगत गटार योजनेचे काम हाती घेतले होते. पण ही योजना निधीच्या कमतरतेमुळे गुंडाळण्यात आली. प्रकल्पातील कोट्यवधींची कामे शिल्लक आहेत. त्यात काही भागातील ड्रेनेजलाईन मुख्य सिव्हरलाईनला जोडण्याच्या कामाचा समावेश आहे. हे काम झाले नसल्यामुळे खाम नदीत ड्रेनेजचे पाणी येऊन प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे १० कोटींचा निधी वापरून ड्रेनेजची अत्यावश्यक कामे केली जाणार आहेत.
व्हर्टिकल गार्डन म्हणजे काय?शहरी भागात उद्यान विकसित करण्यासाठी जागा खूप लागते. त्यामुळे कमी जागेत प्रदूषण रोखण्यासाठी व्हर्टिकल गार्डनचा पर्याय मागील काही वर्षांमध्ये रुढ झाला आहे. या आधुनिक पद्धतीमध्ये एखाद्या भिंतीला लागून एकावर एक झाडे लावण्यात येतात. या झाडांना ठिबक पद्धतीने कमी पाणी लागते. घराच्या आत किंवा बाहेरही अशा पद्धतीचे गार्डन विकसित केले जाते. खासगी एजन्सीकडून महापालिका अशा पद्धतीचे व्हर्टिकल गार्डन विकसित करणार आहे. त्यानंतर देखभाल, दुरुस्ती महापालिकेच्या उद्यान विभागाकडून करण्यात येईल.