औरंगाबाद : येत्या १४ ते १६ आॅक्टोबर या काळात बहुचर्चित वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महोत्सवाचे दि. १४ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वा. वेरूळ लेणीसमोर उद्घाटन होईल, अशी माहिती या महोत्सवाचे मुख्य संयोजक विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी आज येथे एका पत्रपरिषदेत दिली.२०११ मध्ये वेरूळ महोत्सव घेण्यात आला होता. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनंतर यंदा हा महोत्सव होत आहे. यावर्षी मराठवाड्यात चांगला पाऊस झाला. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि उद्योजक, व्यापारी यांच्यासह विविध संस्था- संघटनांनी केलेल्या सहकार्यामुळेच हा महोत्सव साजरा होत आहे, असे डॉ. दांगट म्हणाले. महोत्सवाच्या उद्घाटनास विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री रामदास कदम, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री मदन येरावार, खासदार, आमदार, जि. प. अध्यक्ष, महापौर, नगराध्यक्ष तसेच राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहील. मृदंग-सितारची जुगलबंदी..... उद्घाटनानंतर पार्वती दत्ता यांचे वेरूळ नृत्य दर्शन, पूर्णाश्री राऊत यांचे ओडिसी नृत्य, सानिया पाटणकर यांचे शास्त्रीय गायन होईल. त्यानंतर पंडित उद्धव आपेगावकर व बर्ष कार्नलीस यांची मृदंग व सितार जुगलबंदी होईल. यास्मिनसिंह यांचे कथ्थक व ग्रेसीसिंह यांचे शिवशक्ती नृत्याचे सादरीकरण होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिनेअभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड करतील. १६ आॅक्टोबर रोजी सोनेरी महल येथे प्रसिद्ध सूफी गायक अदनान सामी वन कनिका कपूर यांच्या गायनाचा कार्यक्रम होईल. कलाग्राममध्ये स्थानिक कलावंतांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी १३ ते १७ आॅक्टोबरदरम्यान भरगच्च कार्यक्रम होतील. तेथे विविध कलांचे प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. पत्रपरिषदेस आ. प्रशांत बंब, डी. एम. मुगळीकर, सूर्यकांत हजारे, पारस बोथरा, महेंद्र हरपाळकर, अण्णासाहेब शिंदे, डॉ. मंगला बोरकर आदींची उपस्थिती होती. १५ आॅक्टोबर रोजी सोनेरी महल येथे सायं. ६ ते १० यादरम्यान अजय- अतुल यांच्या गीतांचा कार्यक्रम होईल. यामध्ये श्रेया घोषाल, कुणाल गांजावाला, अभिजित सावंत, ऋषिकेश रानडे, योगिता गोडबोले, प्रियंका बर्वे, स्वरूप खान, सोनाली कुलकर्णी, मकरंद अनासपुरे सहभागी होतील. येत्या १४ ते १६ आॅक्टोबरदरम्यान होत असलेल्या वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवात औरंगाबादच्या प्रख्यात कलासागरचा अत्यंत मोलाचा सहभाग आहे. कलासागरची चांगली टीम आहे. या क्षेत्रातील त्यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. वेरूळ- अजिंठा महोत्सवाला कलासागरचा अत्यंत भक्कम पाठिंबा तर मिळतच आहे, पण व्यवस्थापन व इतर बाबतीत मोलाचे सहकार्य मिळत असल्याचे या महोत्सवाचे मुख्य संयोजक विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी सांगितले.
१४ ते १६ आॅक्टोबरपर्यंत वेरूळ- अजिंठा महोत्सव
By admin | Published: October 08, 2016 1:07 AM