औरंगाबाद : औरंगाबाद शहराची सांस्कृतिक ओळख बनलेला वेरूळ महोत्सव गतवर्षी घेता आला नसला तरी यंदा मात्र तो घेणारच, असा निर्धार जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी आज व्यक्त केला. तसेच पर्यटन विकासाच्या दृष्टीने चालू वर्षात काही नवीन गोष्टी केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.सहा वर्षांपूर्वीपर्यंत औरंगाबादेत दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात वेरूळ महोत्सव भरविला जात होता; मात्र २००८ साली मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यामुळे हा महोत्सव ऐनवेळी रद्द करण्यात आला. त्यानंतर २००९ मध्ये स्वाईन फ्लू आणि त्यानंतर दोन वर्षे दुष्काळामुळे तो होऊ शकला नाही. २०१२ मध्ये हा महोत्सव भरविण्यात आला. गतवर्षी कोणतेही कारण नसताना हा महोत्सव होऊ शकला नाही. यंदा मात्र आता हा महोत्सव भरविण्यात येणारच असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आज सांगितले. महोत्सवासाठी सुमारे १ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. महोत्सवाची तयारीही लवकरच सुरू करणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. पहिला वेरूळ महोत्सव १९८६ साली वेरूळ येथे कैलास लेण्याच्या पायथ्याशी पहिला वेरूळ महोत्सव साजरा झाला. पुढे २००२ साली हा महोत्सव औरंगाबादेत स्थलांतरित झाला. तेव्हापासून विद्यापीठ परिसरातील सोनेरी महल येथे हा महोत्सव नोव्हेंबर महिन्यात भरविला जातो. आतापर्यंत या महोत्सवात अनेक दिग्गज कलावंतांनी आपली कला सादर केली आहे. यामध्ये हेमामालिनी, उस्ताद बिस्मिल्लाखान, अमिताभ बच्चन, झाकीर हुसेन, शास्त्रीय गायक उस्ताद राशिद खान, बासरीवादक राणू मुजूमदार आदींचा समावेश आहे. हॉट बलूनसाठी प्रयत्नजिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी वेरूळच्या घाटात हॉट बलूनचा विचार सुरू आहे. पर्यटकांना मोठ्या फुग्यांद्वारे आकाशात जाऊन येथील निसर्गसौंदर्य आणि पर्यटनस्थळे पाहता येणार आहेत. हा पर्याय खूप खर्चिक आहे. तरीही एका आंतरराष्ट्रीय कंपनीशी याबाबत प्राथमिक बोलणी झाली आहे. जिल्हा प्रशासनाने कंपनीला स्वत: हे बलून खरेदी करून देण्याची तयारी दर्शविली आहे. कंपनीने हे बलून केवळ चालवावेत व त्याचा नफा स्वत: घ्यावा असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे; परंतु अद्याप कंपनीकडून होकार आलेला नसल्याचे जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी सांगितले. याशिवाय वेरूळ आणि अजिंठा या दोन पर्यटनस्थळांसाठी औरंगाबादेतून दोन व्हॉल्वो बस सुरू करण्यात येणार आहेत. जिल्हा नियोजन समितीतून या बसेससाठी १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. बसेसच्या खरेदीची प्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हाधिकारी विक्रम कुमार म्हणाले.
वेरूळ महोत्सव यंदा घेणारच
By admin | Published: June 13, 2014 1:08 AM