खुलताबाद :-श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी लाखो भाविकांनी वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वराचे दर्शन घेतले. पहाटेपासून भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती. भाविकांनी मोठ्या मनोभावे महादेवास बेलफुल वाहिले.
राज्यासह परराज्यातून लाखो भाविक शंकराच्या दर्शनासाठी वेरूळ येथे रविवारी मध्यरात्रीपासूनच दाखल झाले होते. ओम् नमः शिवाय, हर हर महादेव, हे भोळ्या शंकरा असा जयघोषात टाळ आणि मृदंगाच्या आवाजात लाखो भाविक दर्शन घेऊन परतत होते. रविवारी रात्रीपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. रात्री बारा वाजता श्री घृष्णेश्वराची महापुजा होऊन रात्रभर मंदीर उघडे ठेवण्यात आले होते. आज सकाळी आठ वाजेच्या दरम्यान विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी दर्शन घेतले. यावेळी तालुकाप्रमुख राजू वरकड, सरपंच विशाल खोसरे, गोकुळ गवळी आणि मंदीर देवस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.
घृष्णेश्वर मंदिर देवस्थानच्यावतीने येणाऱ्या भाविकांसाठी बॅरिकेटिंग, पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच यावेळी रेणुका माता सेवा मंडळचे श्री गणेश वैद्य व स्वयंसेवकांच्यावतीने सात क्विंटल पेक्षा जास्त साबुदाणा खिचडीचे वाटपही करण्यात आले होते. तर दत्ताजी भाले रक्तपेढीच्यावतीने रक्तदान शिबिराचे ही आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आलेल्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी 2 पोलीस निरीक्षक, 25 अधिकारी 110, पोलीस कर्मचारी आणि 150 च्या वर होमगार्ड्स आणि 1 दंगा काबू पथक दोन शिफ्टमध्ये या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.