औरंगाबाद : न्यायदान प्रक्रियेत विलंब होणे हे अतिशय घातक आहे. हा एक प्रकारे अन्याय करणे होय. यावर न्यायाधीश आणि विधिज्ञांनी एकत्रितपणे मार्ग काढणे आवश्यक आहे. न्यायदानाचे काम जलद गतीने कसे होईल, याची खबरदारी घेतली पाहिजे. कायदेमंडळानेही याबाबत भरीव योगदान दिले पाहिजे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग यांनी औरंगाबाद खंडपीठात बोलताना व्यक्त केले.
मुख्य न्यायमूर्ती नंद्राजोग एक आठवड्याच्या न्यायिक कामकाजासाठी येथे आले होते. याचे औचित्य साधून खंडपीठ वकील संघातर्फे गुरुवारी (दि.२६) त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर खंडपीठातील वरिष्ठ न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, वकील संघाच्या अध्यक्ष अॅड. सुरेखा महाजन आणि सचिव अॅड. शहाजी घाटोळ पाटील उपस्थित होते. मुख्य न्या. नंद्राजोग पुढे म्हणाले की, सध्याच्या इंटरनेटच्या युगात अत्याधुनिक बाबींचा वापर करून न्यायिक क्षेत्रात बदल घडवून न्यायदान करणे गरजेचे आहे. वकिलांनी न्यायनिवाडे सादर करून निकाल प्रभावीपणे देण्यास सहकार्य करावे. नवीन वकिलांनी प्रकरणे सादर करताना परिस्थितीची योग्य प्रकारे मांडणी करावी.
न्या. वराळे म्हणाले की, मुख्य न्यायमूर्ती हे ज्ञानी व तपस्वी व्यक्तिमत्त्व आहेत. न्यायिक क्षेत्रातील सर्व शाखांत त्यांचे प्रभुत्व आहे. त्यांची कामकाजाची पद्धत वाखाणण्याजोगी आहे. त्यांचा आदर्श घेऊन सर्व न्यायमूर्ती आणि वकिलांनी त्यांचे काम प्रभावीपणे करावे. अॅड. महाजन यांनी प्रास्ताविकात वकिलांचे विविध प्रश्न, खंडपीठ परिसरातील पार्किंगची सुविधा, वकिलांचे चेम्बर्स आदी भौतिक सोयी-सुविधांकरीता निधीची मागणी केली, तसेच अंतर्गत रस्ते, जलवाहिन्या, पाणीपुरवठा, अखंड वीजपुरवठा आणि इलेक्ट्रिक फीडर आदी सुविधा पुरविण्याचीही मागणी केली. अॅड. अनघा पेडगावकर यांनी सूत्रसंचालन केले, तर सचिव शहाजी घाटोळ पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी वकील संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
घटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकरांचा वारसा चालवावामहाराष्ट्रास राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा लाभला आहे. त्यांच्या न्यायिक तत्त्वांचे सर्वांनी पालन करावे व त्यांचा वारसा सर्वांनी अखंडपणे चालवावा. समानता, बंधुता आणि व्यक्ती स्वातंत्र्य या मूलतत्त्वांची अंमलबजावणी होईल, याची दक्षता सर्वांनी घ्यावी आणि समाजाला नवी दिशा देण्याचे काम करण्याचे आवाहन मुख्य न्यायमूर्ती नंद्राजोग यांनी केले.