छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विभागांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. दोन फेऱ्यांनंतर विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांना अवघे ४१९ प्रवेश झाले. त्यामुळे आता संपूर्ण भिस्त ही २ ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्पॉट ॲडमिशनवर असणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
तत्कालीन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनीही पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला सीईटी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हाही प्रवेश कमी होत असल्यामुळे वारंवार मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर कुलगुरूपदी आलेले डॉ. प्रमोद येवले यांनी सीईटी रद्द करीत पदवीच्या गुणांवरून प्रवेश देण्यास सुरुवात केली. त्यामुळे अनेक विभागांमध्ये १०० टक्क्यांपर्यंत प्रवेश झाले. पण, विद्यमान कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी आगामी 'नॅक' मूल्यांकनामुळे विद्यापीठातील संपूर्ण प्रवेश युजीसीच्या पोर्टलच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पदवीचे निकाल वेळेवर लागले नाहीत. त्याशिवाय सीईटीची प्रक्रियाही दिलेल्या मुदतीत पूर्ण न झाल्यामुळे १५ मे रोजी सुरू झालेली प्रक्रिया ऑगस्ट उजाडला तरीही पूर्ण झाली नाही. त्यामुळे विद्यापीठातील विभागातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांना अत्यल्प प्रवेश झाले आहेत. त्याचवेळी संलग्न महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश हाऊसफुल्ल झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. दोन फेऱ्यांनंतर २९ जुलै रोजी तिसऱ्या फेरीतील गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. रिक्त राहिलेल्या जागांवर ३० आणि ३१ जुलैला प्रत्यक्ष प्रवेश दिले जाणार आहेत.
अत्यल्प प्रतिसाद मिळालेले अभ्यासक्रमविद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रम असलेले एमएस्सी सांख्यिकीशास्त्र ५, एम. ए. लोकप्रशासनशास्त्र १, एम. ए. स्त्री अभ्यास १४, एम. एस्सी. नॅनो टेक्नॉलॉजी ३, एमएसडब्ल्यू ०, एमएस्सी पर्यावरणशास्त्र ०, एम. ए. फुले-आंबेडकर थॉट्स ०, एम. ए. संस्कृत ४, एम. ग्रंथालयशास्त्र २, पर्यटन प्रशासनशास्त्र ५, एम. व्होक ०, एम. ए. आजीवन विकास व विस्तार ०, एमएस्सी इलेक्ट्रॉनिक्स २, एम. ए. मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम १, एमएस्सी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी ०, एम.ए. नाट्यशास्त्र १, एम.एस्सी संगणकशास्त्र २, एम.ए. हिंदी २, एम.एस्सी जैवतंत्रज्ञान ३, भाैतिकशास्त्र ३, प्राणीशास्त्र विभागात १३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.