- बापू सोळुंकेऔरंगाबाद : मुलगा, मुलगी असा लिंगभेद करू नये, यासाठी एक अथवा दोन मुलींच्या जन्मानंतर पाळणा थांबविणाऱ्या कुटुंबांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाची माझी कन्या भाग्यश्री योजना चार वर्षापूर्वी सुरू झाली. जिल्ह्यातील ९२ आदर्श जोडप्यांनी एक अथवा दोन मुलींच्या जन्मानंतर पाळणा थांबविल्याची माहिती मिळाली.
आजच्या युगात सर्वच क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया काम करताना दिसतात. असे असले तरी आजही समाजात वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा, असा हट्ट धरला जातो. यामुळे पहिल्या दोन मुलींच्या जन्मानंतरही मुलगा व्हावा, यासाठी जोडपी प्रयत्न करताना दिसतात. लोकसंख्या नियंत्रणात राहण्यास मदत व्हावी, यासाठी पहिल्या अथवा दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या दाम्पत्याला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने १ ऑगस्ट २०१७ रोजी माझी कन्या भाग्यश्री ही सुधारित योजना आणली. ती अस्तित्वात आल्यापासून आतापर्यंत ९२ जोडप्यांनी एक अथवा दोन मुलींच्या जन्मानंतर शस्त्रक्रिया केली.
या योजनेंतर्गत शस्त्रक्रिया केलेल्या कुटुंबाला शासनाकडून ५० हजार रु. मिळतात. ही रक्कम मुलगी आणि आईच्या संयुक्त खात्यात १८ वर्षांसाठी मुदत ठेव ठेवली जाते. मुलगी सहा आणि बारा वर्षाची झाल्यावर या रकमेवरील व्याज काढता येते. मुलीच्या १८ व्या वर्षी मूळ ५० हजार रु. आणि व्याज मिळते. तर दोन मुलींच्या जन्मानंतर पाळणा हलविणे थांबविले तर दोन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी २५ हजार रु. असे एकूण ५० हजार रु. मुदत ठेव ठेवली जाते. यामध्ये मुलगी ६ आणि १२ वर्षाची झाल्यावर व्याज काढता येते. वयाच्या १८ व्या वर्षी मूळ रक्कम आणि व्याज बँकेतून काढून घेता येते. जि. प.च्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या या योजनेला चार वर्षात अत्यल्प प्रतिसाद मिळाला.
मागील चार वर्षातील लाभार्थीवर्ष २०१८-----१० लाभार्थीवर्ष २०१९-----५१वर्ष२०२०---------२३वर्ष२०२१----------०८