औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी पूर्ण वेळ कुलगुरू निवडण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता मावळली आहे. यामुळे काही दिवसांसाठी विद्यापीठाला प्रभारी कुलगुरू मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांचा कार्यकाळ ३ जून रोजी संपणार आहे. त्यापूर्वी पूर्ण वेळ कुलगुरूंची निवड होणे आवश्यक आहे. कुलपती तथा राज्यपालांनी नेमलेल्या समितीची पहिली बैठक मागील आठवड्यात मुंबईत पार पडली आहे. बैठकीला समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती अनिल दवे, सदस्य प्रधान सचिव भूषण गगराणी, एनआयटीचे संचालक डॉ. प्रवीण कुमार यांची उपस्थिती होती. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार कुलगुरूपदासाठी अर्ज मागविण्यासाठी शुक्रवारी (दि.१९) जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या जाहिरातीनुसार इच्छुकांकडून २२ मेपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. तसेच कुलगुरूपदाच्या निवडीसाठी समन्वयक म्हणून विवेक कुरमुडे यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. २२ मेपर्यंत अर्ज करण्याची मुदत असून, त्यानंतर आलेल्या अर्जांची छाननी केली जाईल. छाननीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. मुलाखतीचे पत्र पाठविल्यापासून उमेदवारांना किमान १५ दिवसांपेक्षा अधिकचा अवधी देण्याचे संकेत आहेत. त्यामुळे ३ जूनपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होणे अशक्य आहे. अर्जाची मुदत संपल्यानंतर पुढील प्रक्रिया होण्यासाठी किमान महिनाभरापेक्षा अधिक कालावधी लागणार आहे. त्यामुळे ४ जून रोजी विद्यापीठाचा कारभार प्रभारी व्यक्तींकडेच द्यावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे विद्यापीठाचा प्रभारी कारभार प्रकुलगुरू डॉ.अशोक तेजनकर यांच्याकडे दिला जातो की, इतर विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे सोपविण्यात येतो, याकडे विद्यापीठ वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
कुलसचिव, परीक्षा संचालकांच्या मुलाखती बारगळणारविद्यापीठाच्या पूर्ण वेळ कुलसचिव, परीक्षा संचालक नेमण्यासाठी कुलगुरू डॉ. चोपडे यांनी मुलाखतीचे आयोजन केले होते. मात्र, आचारसंहिता असल्यामुळे मुलाखती घेण्यात येऊ नये, अशी मागणी करणारे पत्रच सत्ताधारी गटाचे व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे यांनी कुलगुरूंसह राज्यपालांना दिले आहे. तसेच कुलगुरूंचा कार्यकाळ एक महिना दहा दिवस एवढाच राहिला असताना त्यांनी पुढील पाच वर्षांसाठी कुलसचिव व परीक्षा संचालक नेमू नयेत, मागील पाच वर्षांत नेमले नाहीत, त्यामुळे येणाऱ्या कुलगुरूंनीच आगामी पाच वर्षांसाठीच्या या अधिकाऱ्यांची नेमणूक केली पाहिजे, अशी भूमिका व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संजय निंबाळकर, डॉ. राजेश करपे, डॉ. फुलचंद सलामपुरे आदींनी घेतली आहे. यामुळे पूर्ण वेळ कुलसचिवपद मिळण्यासाठी प्रयत्न करणाºया प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांचे स्वप्न धुळीस मिळण्याची शक्यता आहे.