औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात नामांतर शहीद स्मारक उभारण्याचा निर्णय घेतल्याबद्दल शहरातील विविध सामाजिक चळवळीतील पदाधिकाऱ्यांनी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची भेट घेऊन कृतज्ञ भावना व्यक्त केली.
विद्यापीठ नामांतराचा लढा १७ वर्षे चालला. या आंदोलनात अनेक तरुण शहीद झाले. हजारो घरांची राखरांगोळी झाली. अखेर विद्यापीठाचा नामविस्तार झाला आणि पेटलेला मराठवाडा शांत झाला. विद्यापीठात नामांतर लढ्याचा संपूर्ण इतिहास, शहिदांची संपूर्ण माहिती असलेले एक स्मारक व्हावे, अशी सर्व समाजातील लोकांची इच्छा होती. या मागणीनुसार या महिन्यात विद्यापीठाने सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल पुरोगामी विचारांच्या नागरिकांमध्ये विद्यापीठ व कुलगुरूंविषयी अत्यंत चांगल्या भावना निर्माण झाल्या आहेत. त्याचा एक भाग म्हणून कुलगुरूंप्रती कृतज्ञ भावना व्यक्त करण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ कुलगुरूंना भेटले. भावी पिढीला प्रेरणा देणारे, नामांतर लढ्याचा संपूर्ण इतिहास सांगणारे शहीद स्मारक व्हावे, तसेच स्मारकासाठी पुरवणी अर्थसंकल्पात वाढीव तरतूद करावी, अशी मागणी केली.
याचबरोबर विद्यापीठ अधिसभा, व्यवस्थापन परिषदच्या सर्व सदस्यांनी या प्रकल्पासाठी तरतूद केली, याबद्दलही शिष्टमंडळाने अभिनंदन केले. शिष्टमंडळात रिपाइंचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम, मिलिंद शेळके, दौलत खरात, संजय ठोकळ, किशोर थोरात, पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे प्रकाश निकाळजे, भारिपचे महासचिव अमित भुईगळ, अधिसभा सदस्य प्रा. सुनील मगरे, ॲड. विजय सुबुकडे, गौतम लांडगे, डॉ. सचिन बोरडे, गुरमितसिंग गील यांची उपस्थिती होती.
(सोबत फोटो जोडला आहे.)
कॅप्शन :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नामांतर शहीद स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याबद्दल विविध संघटनांतर्फे मा.कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचा सत्कार करण्यात आला.