औरंगाबाद : गुंडांकरवी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना मारहाण करणे, विद्यार्थिनींचे आंदोलन, गांधी मार्चची खिल्ली उडविणे, व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सदस्यांना आडवे केल्याची भाषा वापरणे आदी प्रकार कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे करीत असल्याचा गंभीर आरोप व्यवस्थापन परिषद, अधिसभा सदस्य आणि विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.चोपडे यांचा आक्षेपार्ह संवाद असलेली आॅडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यात कुलगुरू शंकर, विजय आणि सचिन अशी नावे घेत आहेत. विजय सुबुकडे पाटील यांनी पोलीस आयुक्तांकडे दिलेल्या तक्रारीनंतर डॉ. शंकर अंभोरे, डॉ. सचिन बोर्डे आणि ते स्वत: असल्याचे स्पष्ट झाले. सचिनची गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना कुलगुरूंच्या घरापर्यंत, कार्यालयात या व्यक्तीचा वावर कसा? डॉ. अंभोरे यांच्या नेमणुकीविषयी राज्यपालांनीच कुलगुरूंना पत्र पाठवून कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानंतरही कुलगुरू त्यांना पाठीशी घालत आहेत, असे सदस्यांनी सांगितले.कॅरिआॅनसंदर्भात संजय निंबाळकर समितीने अहवाल दिल्यानंतर कुलगुरू त्यांना शंकरने बैठकीत ‘आडवे’ केल्याची भाषा वापरतात, असे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नरेंद्र काळे यांनी सांगितले.ती सुपर पॉवर महिला कोण?त्या आॅडिओमध्ये गांधी सन्मान मार्चची खिल्ली उडविणारी महिला कोण? विद्यापीठ प्रवेशद्वारापासूनच नव्हे क्रांती चौकातून मोर्चा काढण्याचा सल्ला देतात.त्यांचा विद्यापीठाच्या कामकाजाशी संबंधच काय? असा सवाल प्रा. रमेश भुतेकर यांनी उपस्थित केला.
मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु वादात; गुंडांची मदत घेतल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 3:59 AM