लोहारा : तालुक्यातील उंडरगाव हे गेल्या आठ दिवसांपासून संपूर्ण गाव अंधारात असून, यामुळे पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. परंतु, याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी गुरुवारी सकाळी सरपंचपतीसह उपसरपंच व तिघा ग्रामपंचायत सदस्यांना सुमारे तीन तास ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून ठेवल्याचा प्रकार घडला.उंडरगाव व परिसरात ४ जून रोजी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली होती. यात कार्ला (ता. तुळजापूर) येथून येणारे विजेचे अकरा पोल अर्ध्यातून तुटून कोसळले. तसेच डीपीही उन्मळून पडली. यामुळे गावचा वीज पुरवठा ठप्प झाला आहे. यामुळे गावात पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. याबाबत वारंवार विनंत्या करूनही कोणीच याकडे लक्ष द्यायला तयार नसल्याने गावकऱ्यांत संतापाचे वातावरण आहे. याचाच परिणाम म्हणून ही गुरूवारची घटना घडली.गुरूवारी सकाळी सरपंचपती तात्याराव गंगणे, उपसरपंच साहेबराव सूर्यवंशी तसेच सदस्य नवनाथ पांचाळ, कालिदास रवळे व अन्य एक सदस्य कामानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात आले होते. ग्रामस्थांनी हीच संधी साधत सकाळी साडेसातच्या सुमारास या पाच जणांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून टाकले. ही माहिती कळताच साडेदहा वाजेच्या सुमारास पंचायत समितीचे सहाय्यक के. जी. मागाडे, विस्ताराधिकारी एस. जी. पाटील, कनिष्ठ सहाय्यक बिराजदार यांनी उंडरगाव येथे येऊन गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अखेर तीन तासानंतर साडेदहाच्या सुमारास गावकऱ्यांनी या तिघांना खोलीतून बाहेर सोडले. यानंतर ही सर्व मंडळी तुळजापूर येथील वीज कंपनीच्या कार्यालयात दाखल झाली. यावेळी तेथील अभियंत्यांनी शुक्रवारी वीज पुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिले. (वार्ताहर)तहसीलदारांसमोर समस्यांचा पाढाही घटना समजताच तहसीलदार ज्योती चौहान, नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे, तलाठी जगदीश लांडगे, वाजिद मनियार, एन. बी. गायकवाड यांनीही उंडरगावात येऊन गावकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचण्यास सुरुवात केली. गावची वीज आठ दिवसांपासून बंद आहे. गावाला लाईनमन नाही. विजेअभावी पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे गावाला लोहाऱ्यातून वीज पुरवठा सुरू करावा, अशी मागणी यावेळी गावकऱ्यांनी केली. यावेळी वीज कंपनीचे कनिष्ठ अभियंता पी. जी. जोगी यांनी शुक्रवारपर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. वादळामुळे पडलेले पोल तसेच डीपीसंदर्भात ग्रामपंचायतीने वारंवार वीज वितरण कंपनीच्या लोहारा तसेच तुळजापूर कार्यालयाकडे पाठपुरवठा केला आहे. परंतु, संबंधितांनी याकडे दुर्लक्ष केले. आजच्या प्रकारानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असल्याचे सरपंच प्रभावती गंगणे यांनी सांगितले.कामे निकृष्टउंडरगाव परिसरात वीज वितरण कंपनीने गुत्तेदारामार्फत केलेली कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला. दर्जाहीन कामामुळेच वादळी वाऱ्यात पोल उन्मळून पडण्याऐवजी अर्ध्यातून तुटत आहेत. त्यामुळे या कामाची चौकशी करावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी यावेळी केली. तहसीलदारांनी केली पडलेल्या पोल, डीपीची पाहणीगावकऱ्यांच्या सर्व तक्रारी ऐकून घेतल्यानंतर तहसीलदार चौहान यांनी स्वत: जाऊन पडलेले पोल, डीपी यांची पाहणी केली. तसेच ही कामे तात्काळ करून घेण्याचे आदेश दिले. गावकऱ्यांच्या इतर मागण्या वरिष्ठांकडे पाठवून त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांच्या समस्या सोडविण्याकडे लक्ष द्यावे. यासाठी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा, अशा सूचनाही चौहान यांनी यावेळी दिल्या. याप्रसंगी गोरोबा पवार, राजेंद्र सूर्यवंशी, विजय पाटील, नीळकंठ कोठवळे, देविदास बिराजदार, नानासाहेब जाधव, महादेव खळे, युवराज तोडकरी, बलभीम खळे आदी उपस्थित होते. बस सुरू कराकेवळ शाळा सुरू असतानाच शाळेत महामंडळाची बस येते. तीही सकाळी आली तर रात्री येत नाही. यामुळे ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी जायचे म्हटले तरी अडचण येत असल्याचे तक्रार यावेळी गावकऱ्यांनी केली. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेत पिण्यासाठी पाणी नसल्याचेही तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिले.
सरपंचपतीसह उपसरपंच, सदस्यांना कोंडले
By admin | Published: June 12, 2014 11:43 PM