पैठण : मोहटादेवीचे दर्शन घेऊन गावाकडे परतणाऱ्या महिला भाविकांच्या हॉटेलच्या पार्किंगमध्ये उभ्या चारचाकी वाहनास अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने उडवले. या भिषण अपघातात एक १३ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला तर सात भाविक जखमी झाले आहेत. जखमींना येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. यापैकी तीन गंभीर जखमींंना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजी नगर येथे हलविण्यात आले आहे.
साक्षी परमेश्वर कोरडे (१३) रा गोलटगाव ता. छत्रपती संभाजी नगर असे अपघातात मृत झालेल्या मुलीचे नाव आहे. आदीती नंदकिशोर निंबाळकर (१३), गयाबाई हरी आडे (६५), पार्वती परमेश्वर कोरडे (४०) ,द्वारकाबाई खतकळ (६५), नंदकिशोर निंबाळकर (४०),कैलास राजपूत (२५), कडूबाई सोरमारे (६५) अशी जखमींची नावे आहेत.
शुक्रवारी सकाळी गोलटगाव ता. छत्रपती संभाजी नगर येथील महिला भाविक पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवीच्या दर्शनासाठी मिनी टेम्पो वाहनातून गेल्या. दर्शन करून गावाकडे परत येत असताना रात्री १० वाजता पैठण शहरालगत असलेल्या एका हॉटेलमध्ये सर्वांनी जेवण केले. दरम्यान, हॉटेल बाहेर असलेल्या पार्किंग परिसरात मिनी टेम्पो उभा करण्यात आला होता. जेवण करून आलेल्या काही महिला भाविक परत गाडीत येऊन बसल्या होत्या. तर काही जेवण करत होत्या.
अचानक भरधाव वेगात आलेला ट्रक मिनी टेम्पोवर धडकला. ट्रकच्या धडकेने मिनी टेम्पो बाजुलाच असलेल्या महावितरणच्या डिपीवर जाऊन आदळला. सुदैवाने नेमका विद्युत पुरवठा त्यावेळेस खंडीत झालेला असल्याने मोठी हानी टळली. यावेळी टेम्पो समोर उभ्या साक्षीचा जागीच मृत्यू झाला. तर आत मध्ये बसलेल्या सात भाविक जखमी झाल्या आहेत. अपघाताची माहिती मिळताच शेखर शिंदे यांनी विलास बापू प्रतिष्ठानची रूग्णवाहिका बोलावून जखमींना रूग्णालयात हलवले. अक्षय गायकवाड, सतिष बोबडे, जनार्दन मीटकर, पवन खराद, गणेश वीर रामा भोजने, गणेश वाघमोडे, पांडुरंग धांडे या तरूणांनी जखमींना हलविण्यासाठी मदत करून महिला भाविकांना दिलासा दिला.
घटनास्थळा समोर शंभर फुटापेक्षा जास्त रूंद रस्ता आहे. परंतु भरधाव वाळूच्या ट्रकने रस्ता सोडून हॉटेल बाहेर उभा असलेल्या महिला भाविकांच्या वाहनाला धडक दिली. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला. दरम्यान ट्रकवर खाडाखोड केलेले दोन क्रमांक आढळून आले. अवैध वाळू वाहतुकीने चिमुकलीचा बळी घेतल्याने जनतेतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.