छत्रपती संभाजीनगर : ताशी १०० कि.मी.च्या वेगाने धावणारी मुंबई- जालना वंदे भारत एक्स्प्रेसमधील एका बोगीत अचानक सायरन वाजू लागतो आणि काही अंतरावर जाऊन ही रेल्वे जाऊन उभी राहते. आगीच्या भीतीने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडते. परंतु हा सगळा प्रकार सिगारेटच्या धुरामुळे झाल्याचे स्पष्ट होते आणि प्रवासी सुटकेचा नि:श्वास सोडतात. या सगळ्यामुळे सिगारेट पिणे एका प्रवाशाला चांगलेच महागात पडले. त्याला नाशिक रेल्वेस्टेशनवरील रेल्वे सुरक्षा बलाने उतरवून घेतले.
या रेल्वेने प्रवास करणारे शहरातील वैभव पिंपळे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, नाशिकजवळ वंदे भारत एक्स्प्रेस असताना अचानक सायरन वाजू लागला. त्यानंतर काही अंतरावर ही रेल्वे थांबली. रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले. तेव्हा एक जण बाथरुममध्ये जाऊन सिगारेट पित असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून त्याला नाशिक रेल्वेस्टेशनवर रेल्वेतून उतरवून घेण्यात आले.