छत्रपती संभाजीनगर : जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात बदलीच्या संदर्भात आलेल्या महिला पोलिस अंमलदारासोबत नगर नाका परिसरात एका व्यक्तीने गाडीचा धक्का लागल्याचे कारण दाखवून रस्त्यावरच हुज्जत घातली. त्याचवेळी मुख्य रस्त्यावर वाहन आडवे लावून रहदारीस अडथळा निर्माण केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर छावणी पोलिसांनी स्वत:हून दखल घेत आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे.
पिशोर पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या एक महिला पोलिस अंमलदार शासकीय कामानिमित्त शहरात आल्या होत्या. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील काम संपवून पिशोरच्या दिशेने जात असताना नगर नाका येथे त्यांच्या गाडीचा बुलेटस्वाराला धक्का लागला. त्यानंतर बुलेटस्वाराने रस्त्यावर त्यांची गाडी अडवून मधोमध दुचाकी लावली. त्यामुळे नगर नाका चौकात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली. त्यात रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
तसेच वाहनधारकांनी बुलेटस्वाराला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, तेव्हा त्यांच्यावरही आरडाओरड केल्याचा प्रकार ३० मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला आहे. या प्रकरणात छावणी पोलिसांनी महिला पोलिस अंमलदाराने तक्रार देण्यास नकार दिल्यानंतर छावणीचे सपोनि पांडुरंग भागिले यांनी फिर्याद देत बुलेटस्वाराच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती निरीक्षक कैलाश देशमाने यांनी दिली.