फुलंब्री : मराठा आरक्षण मागणीवरून आंदोलक आक्रमक झाले आहेत. आज सकाळी छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गावर पाच ठिकाणी रास्तारोको आंदोलन सुरु आहे. तर खुलताबाद रस्त्यावर दोन ठिकाणी आंदोलन केले जात आहे. यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे.
फुलंब्री तालुक्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. सोमवारी दोन ठिकाणी आंदोलन केल्यानंतर आंदोलकांनी आज छत्रपती संभाजी नगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गावर पाच ठिकाणी रास्तारोको केले. गणोरी, फुलंब्री, पालफाटा, पाथ्री फाटा,खामगाव फाटा,आळंद या पाच ठिकाणी सकाळी ११ वाजल्यापासून रास्तारोको आंदोलन सुरु आहे.
तसेच फुलंब्री -खुलताबाद मार्गावर देखील देवगिरी कारखाना आणि वारेगाव या दोन ठिकाणी रास्तारोको करण्यात आला. आंदोलक अनेक ठिकाण टायर जाळून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत आहेत. यामुळे या दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. आंदोलकांनी रुग्णवाहिका व्यतिरिक्त एकही वाहनाला पुढे जाऊ दिले नाही. पोलीस अधिकाऱ्यांचे वाहन ही थांबविण्यात आले.