फुलंब्री (औरंगाबाद) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साधेपणाचा अनुभव औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्या दरम्यान सर्वांना आला. रविवारी सिल्लोड येथील सभा संपवून रात्री ९ वाजेच्या दरम्यान औरंगाबादकडे परतत असताना मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा अचानक फुलंब्री टी-पॉईंटवरील एका साध्या चहा टपरीजवळ थांबला. मुख्यमंत्र्यांचा ताफा थाबंल्याने सारे कुतूहलाने पाहत होते. तेवढ्यात मुख्यमंत्री शिंदे गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी त्या टपरीवरील चहाचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आ. अब्दुल सत्तार आदींची उपस्थिती होती.
मराठवाडा विभागीय आढावा बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी दुपारी सिल्लोडला जाहीर सभेसाठी गेले होते. आ. अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात प्रचंड प्रतिसाद मिळालेल्या या सभेनतंर रात्री मुख्यमंत्री औरंगाबादकडे रवाना झाले. दरम्यान, रात्री ९ वाजेच्या दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा अचानक फुलंब्री टी-पॉईंटवर थांबला. ताफा थांबल्याने सुरक्षा अधिकारी-कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. मुख्यमंत्री शिंदे यांनी सहकाऱ्यांसह येथील जब्बार पटेल यांच्या टपरीवर चहाचा आस्वाद घेतला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे,आमदार अब्दुल सत्तार ,नगराध्यक्ष सुहास सिरसाठ,माजी सभापती किशोर बलांडे अनेक कार्यकर्त्यांनी देखील येथील चहाचा आस्वाद घेतला. त्यानतंर मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः टपरी चालक जब्बार पटेल यांना बिलाचे दोन हजार रुपये दिले.
मुख्यमंत्र्यांच्या साधेपणाची चर्चामुख्यमंत्र्यांच्या भोवती कडक सुरक्षा कवच असते. रात्री किमान ७० वाहनांचा ताफा असतो. तो ताफा अचानक थांबवून मुख्यमंत्र्यांनी एका साध्या टपरीवर थांबून चहा घेतला. मुख्यमंत्री एका साध्या टपरीवर चहा घेण्यासाठी थांबलेले आहेत, ही वार्ता सर्वत्र पसरली. त्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती.