- संजय खाकरेपरळी (बीड): येथील परळी औष्णिक विद्युत केंद्रातील बंद पडलेल्या संच क्रमांक तीनची १२० फुट उंच असलेली चिमणी (धुरंडा ) आज सकाळी 9 वाजता पाडण्यात आली. राखेचा धूर बाहेर सोडणारी ही चिमणी आयुर्मान संपल्याने पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
210 मेगावॅटचे क्षमतेचा संच क्रमांक तीनचे आयुर्मान संपल्याने महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने हा संच स्क्रॅपमध्ये काढला होता. स्क्रॅप अंतर्गत सोमवारी सकाळी संबंधित शिवालय कन्स्ट्रक्शन एजन्सीने ही चिमणी पाडली. यावेळी विद्युत केंद्राचे अधिकारी, सुरक्षा विभागाचे कर्मचारी आणि कंस्ट्रक्शन विभागाचे कामगार उपस्थित होते. 210 मेगावॅटचे क्षमतेचा संच क्रमांक तीन हा काही वर्षांपूर्वी आयुर्मान संपल्यामुळे स्क्रॅप मध्ये काढला आहे. संच क्रमांक तीनमधील काही साहित्य तोडफोड करून संबंधित कन्स्ट्रक्शन एजन्सीने या पूर्वी उचलले आहे. शेवटच्या टप्प्यातील संच क्रमांक तीनची चिमणी आज सकाळी जमीनदोस्त करण्यात आली.
संच क्रमांक 3 हा सन 1980 मध्ये कार्यान्वित करण्यात आला होता. आयुर्मान संपल्याने 2015 पासून हा संच बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर सन 2019 पूर्वी हा संच स्क्रॅपमध्ये काढण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी महाजनकोने परळी औष्णिक विद्युत केंद्रातील 30 मेगावॅटचे दोन संच स्क्रॅप मध्ये काढलेले आहेत. परळी विद्युत केंद्रातील संच क्रमांक तीन, चार, पाच हे तीन संच 2019 पासून बंद आहेत. त्यापैकी संच क्रमांक तीनची 120 फूट उंचीची चिमणी सोमवारी सकाळी पाडण्यात आली. पूर्वीसंच चालू असताना या चिमणीतून राखेचा धूर बाहेर पडत असे.